पंतप्रधान करणार ‘आयआयएम’, ‘एम्स’चे भूमिपूजन

0
14

नागपूर दि.२: राज्य शासनातर्फे ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट) व ‘एम्स’ला (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) मिहान परिसरात जागा देण्यात आली आहे. येत्या दीड महिन्यात या संस्थांच्या इमारतींच्या बांधकामाला सुरुवात होईल व भूमिपूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरातील टिळक पत्रकार भवनात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अगोदर उत्तर नागपुरात येणार होते. परंतु येथील जागेच्या हस्तांतरणासाठी नासुप्रने ३६ कोटी रुपये मागितले. दुसरीकडे या महाविद्यालयासाठी मिहान येथे जागा आरक्षित केली होती. त्यामुळे हे महाविद्यालय तेथे उभारण्यात येणार आहे. उत्तर नागपुरात कौशल्य विकास संस्था सुरू करण्यात येईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. नागपुरातील शैक्षणिक संस्था लवकरात लवकर उभारण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेदेखील त्यांनी प्रतिपादन केले. ‘आयआयएम’ व ‘एम्स’च्या इमारतीचे भूमिपूजन सोबतच करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाबाबत पंतप्रधान येणार असून त्यांच्या कार्यालयातून याबाबत विचारणा झाली आहे. याची तारीख अंतिम व्हायची आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नागपुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, ‘ट्रिपल आयटी’ (इंडियन इस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठ तसेच ‘नायपर’ यांची घोषणा झाली. यातील ‘ट्रिपल आयटी’ व राष्ट्रीय महाराष्ट्र विधी विद्यापीठाची जागा अंतिम झाली आहे. विधी विद्यापीठाचे काम एव्हाना सुरू व्हायला हवे होते. परंतु यातील कायद्याच्या वाक्यरचनेमुळे कायदेशीर तांत्रिक त्रुटी निर्माण झाली होती. संबंधित विद्यापीठाचा कुलगुरू त्याच विद्यापीठातील असावा, अशी ही वाक्यरचना होती. परंतु विद्यापीठच अस्तित्वात नसल्याने कुलगुरू कुठून येणार, असा प्रश्न उभा ठाकला. त्यामुळे यात सुधारणा करण्यात आली असून आता याच्या स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.
गोंडवाना विद्यापीठासाठी देखील गडचिरोली येथे जागा पाहण्यात आली आहे.ही जागा वन विभागाच्या अखत्यारित असून लवकरच येथील अडचणी सोडवून ही जागा विद्यापीठाच्या ताब्यात देण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी दिले.

<>