नगरपंचायीत भाजपला यश मिळवून देण्यात पालकमंत्र्याला अपयश

0
7
गोंदिया,दि, २ -जिल्ह्यातील 4 नगरपंचायतीकरीता रविवारला झालेल्या निवडणुकीची मजमोजणी आज सोमवारला पार पडली.यामध्ये कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळविता आले नाही.मतदारांनी चारही नगरपंचायतीमध्ये दिलेला कौल हा युतीआघाडीचा दिलेला अाहे.भारतीय जनता पक्षाने 24,राष्ट्रीय काँग्रेसने 15, राष्ट्रवादी काँग्रेसने  16 आणि शिवसेनेेने 1 जागा या निवडणुकीत जिंकली. अपक्ष व पॅनलमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या 10 आहे.मनसे व बसपाला या निवडणुकीत खाताही उघडता आलेले नाही.

विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांना आपल्या मतदारसंघातच नव्हे तर जिल्ह्यातील कुठल्याही नगरपंचायतीमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देता आले नाही,हे भाजपचे अपयशच म्हणावे लागेल.तर विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू सावरु लागलेल्या काँग्रेसला देवरी वगळता तीन ठिकाणी पक्षाला जिवंत ठेवण्यात यश मिळाले आहे.मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अधिक जागा पटकावणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देवरी वगळता तीन नगरपंचायतीमध्ये पहिल्या स्थानावर येऊ शकले नाही.

गोरेगाव येथे तर राष्ट्वादीला गोरेगाव विकास आघाडीनेच पराभवाचा धक्का दिला.गोरेगावमध्ये गोरेगावविकास आघाडीने 17 जागा लक्ष्मीकांत बारेवार यांच्या नेतृत्वात लढविल्या परंतु बारेवार स्वत पराभूत झाले.त्यांना राष्ट्रवादीचे डाॅ.रुस्तम येळे यांनी पराभूत केले.ही एकमेव जागा राष्ट्रवादीने गोरेगावात जिंकली.तर बारेवार यांचे पुत्र आशिष बारेवार यांनी काँग्रेसचे माजी जि.प.सदस्य जगदिश येरोला यांचा पराभव केला.गोरेगावमध्ये बारेवार यांच्या गोरेगाव विकास आघाडीने  4 जागा जिंकून सत्तेची चाबी आपल्याशिवाय कुणीही पुर्ण करु शकत नसल्याचे दाखवून दिल्याने भाजप असो की काँग्रेसला विकास आघाडीला सत्तेसाठी सोबत घ्यावे लागणार आहे.

गोरेगाव नगरपंचायतमधील 17 जागेतील पक्षनिहाय स्थिती याप्रमाणे भारतीय जनता पक्ष ७,राष्ट्रीय काग्रेस ५,राष्ट्रवादी काग्रेस १,गोरेगाव विकास आघाडी(अपक्ष) ४ येथे मनसे ,सेना व बसपला खाते उघडता आले नाही.सडक अर्जुनी नगरपंचायतीच्या 17 जागापैकीभारतीय जनता पक्ष 4, राष्ट्रीय काग्रेस  3,राष्ट्रवादी काग्रेस  5, स्वतंत्र उमेदवार  1 व बाहुबली प्रगती पॅनलचे 4 उमेदवार विजयी झाले.अर्जुनी मोरगाव नगर पंचायतमध्ये भारतीय जनता पक्ष   6,राष्ट्रीय काग्रेस 6,राष्ट्रवादी काग्रेस  २,स्वतंत्र उमेदवार  २ व शिवसेनेचा 1 उमेदवार निवडून आला.तर देवरी नगरपंचायतीच्या 17 जागापैकी भारतीय जनता पक्ष  ७,राष्ट्रीय काग्रेस १,राष्ट्रवादी काग्रेस ८ आणि स्वतंत्र उमेदवार  १ विजयी झाला.या ठिकाणी सुध्दा मनसे व सेनेला खाता उघडता आले नाही.