रोहयो ठरली रोजगाराचा आधारवड; ८५ हजार कुंटूंबाना रोजगार

0
9

ङ्घ ९३ कोटी ६९ लक्ष रुपये खर्च
ङ्घ ४५ लक्ष ५६ हजार मनुष्य दिवस निर्मिती
गोंदिया,दि.१८ : महात्मा गांधी रोजगार हमी योजना म्हणजे ग्रामीण भागातील मजूरांची आर्थिक विकास साधणारी योजना. कामाच्या शोधात भटकंती करीता गावातील मजूर गाव सोडून शहरामध्ये येतात. अशावेळी त्यांना गाव व गावपरिसरात रोजगार उपलब्ध करुन देवून मजूरांचे स्थलांतर थांबविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करीत असतांना गावांमध्ये मजुरांना काम व रोजगार उपलब्ध होत आहे. पर्यायाने गावाचा विकासही साधला जात आहे. ही योजना ग्रामीण विकासाची व रोजगार निर्मिती करण्यासाठी आधारवड ठरली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही मजुरांना रोजगाराची हमी तर देतेच तसेच गावात पायाभूत सुविधांचा विकासही करण्यात महत्वाची ठरत आहे. योजनेतून झालेल्या कामांमुळे गाव स्वयंपूर्ण व स्वावलंबी होण्यास मदत होत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात १७ फेब्रुवारी २०१६ पर्यंत एकूण ९३ कोटी ६९ लाख ३४ हजार रुपये निधी खर्च करण्यात आला असून त्यावर ४५ लाख ५६ हजार ३१४ लक्ष मनुष्य दिवस निर्मिती झाली आहे. त्यामधून ८५ हजार ७०० कुटूंबांना रोजगार पुरविण्यात आलेला असून त्यापैकी ११ हजार २५६ कुटूंबांना १०० दिवस रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हयातील अनेक मजूर कुटूंबांचे रोजगारानिमित्त होणारे स्थलांतर थांबविण्यास ही योजना मदतगार ठरली आहे.
सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यंवंशी यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली १०० माजी मालगुजारी तलावांचे खोलीकरण व दुरुस्ती तसेच तलावांमध्ये मत्स्यसंवर्धन करुन मत्स्यव्यवसायाला चालना देणे व वैयक्तिक लाभामध्ये पशुपालन गोठा तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांनी या योजनेला आपलेसे केले असून ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या योजनेला प्रतिसाद देत आहेत.
या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीची मोठ्या प्रमाणात विकासाची कामे करण्यात येत आहे. मातीबांध, पांदण रस्ते, सिंचन विहीरी, रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड, भात खाचर तयार करणे, शौचालय, नाला सरळीकरण, सिमेंट नाला बांध, तलाव गाळ काढणे, खोलीकरण, शेततळे, वनतळी, मैदान सपाटीकरण करणे अशा प्रकारची असंख्य कामे करण्यात येत आहे. योजनेच्या काटेकोर, नियोजनबध्द व प्रभावी अंमलबाणीमुळे मजुरांच्या हाताला काम व गावाचा पायाभूत सुविधेसह विकास करण्यास ही योजना महत्वाची ठरली आहे.