नळयोजनेच्या सौर ऊर्जेवरील जीपीएस यंत्रणेमूळे विजेची बचत

0
12

यशोगाथा,खेमेंद्र कटरे
गोंदिया
: गेल्या काही वर्षापासून गोंदिया जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या यांत्रिकी विभागाने आपल्या कल्पकतेचा वापर करुन आणि विजेच्या बचतीसोबतच विज नसल्यामुळे जनतेला पाण्यापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये यासाठी सौरउर्जेवरील हातपंप आणि नळयोजना यशस्वी राबविले आहे.त्यातच गेल्या काही महिन्यापासून तर चक्क महाराष्ट्रातील पहिली जीपीएस प्रणालीद्वारे सौरउर्जेवरील नळयोजना आमगाव तालुक्यातील बोथली येथे राबवून एका नव्या प्रयोगाला यशस्वी करुन दाखविले आहे.या कामासाठी विशेष म्हणजे यांत्रिकी विभागाचे उपअभियंता एन.एस.मानकर व त्यांचे सहकारी अभियंता वानखेडे यांनी कर्मचारी नसल्यामुळे गावातील नळयोजना बंद राहून जनतेला पाण्याचा त्रास सोसावा लागू नये यासाठी बोथली येथे प्रायोगिक तत्वावर ही योजना राबविली.
मोबाईलमध्ये विशेष अॅप किंवा जीपीएससिस्टम सुरु करुन कुठूनही वेऴेवर जनतेला पाणी दिला जाऊ शकतो.ग्रामीण भागात भारनियमन मोठय़ा प्रमाणात असते. याशिवाय सोलर पंपातून पाणी पुरवठा करताना येणार्‍या तांत्रिक अडचणींची माहिती दुर्गम भागातील लोक जिल्हा परिषदेपर्यंत पोहोचवू शकत नाहीत. जीपीएस सिस्टममुळे मात्र सर्व प्रकारची माहिती मोबाईलवर कार्यालयात बसूनच मिळणार आहे.सोबतच कुठला कर्मचार्याने वेळेवर सुरु केले की नाही हे सुध्दा कार्यालयातील ज्या अधिकायाकडील मोबाईलमध्ये जीपीएस यंत्रणा असेल त्याला सर्व कळणार आहे.त्या योजनेचे यश प्रत्यक्ष प्रतिनिधीनेही बोथली येथे असलेल्या सौरउर्जेवरील पंपाच्यास्थळी जाऊन बघितले.भविष्यात सुध्दा जंगलपरिसरात अशा 5 नव्या योजना सुरु करण्याचा मानस तयार करुन आराखडा सादर केलेला आहे.त्यावर अपेक्षित खर्चासाठी त्यांनी विविध कंपन्याकडून तशा निविदा सुध्दा आमंत्रित करण्याची प्रकिया हाती घेतली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यावर शिक्कामोर्तब होण्याची आशा असल्याचे मानकर यांनी बेरार टाईम्सशी बोलतांना सांगितले.तसेच सोलरपंपांना जीपीएस सिस्टम लावण्यासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणी सुरु असून  आम्हाला काय काय  अपेक्षित आहे हे त्यांना सांगितले जात आहे.यामध्ये सर्वच यंत्रणा त्या कंपनीनेच तयार करुन देऊन काही दिवस स्वतःच्या नियंत्रणात सुध्दा ठेवावे लागेल असे सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.कंपन्याकडून आलेल्या माहितीच्या आधारावर वनविभागातील जंगलात किंवा जंगलाशेजारील गावांमध्ये काही ठिकाणी हा प्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
गोंदिया जिल्ह्यात गेल्या काही वर्षात तब्बल २९२ सोलर पंप लावण्यात आले आहेत. सौरउज्रेवर चालणार्‍या मोटरने या पंपामधील पाणी ५ हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत जाते. तेथून खाली लावलेल्या नळांमधून ते पाणी गावकर्‍यांना वापरता येते.तसेही आजपर्यंत गोंदिया जिल्ह्यात टॅंकरची गरज भासलेली नाही.परंतु विजेच्या बिलामुळे अनेकदा नळयोजना बंद पडतात,आणि जनतेला पाणी समस्येला सामोरे जावे लागते.त्यावर रामबाण उपाय म्हणून सोलर(सौर)चा वापर योग्य ठरणार आहे.