सुरेश भोयर यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट कन्व्हिक्शन अवॉर्ड’

0
10

नागपूर : नागपूर ग्रामीण पोलीस गुन्ह्यांच्या तपास कार्यात तसेच गुन्हेगारांना योग्य शिक्षा मिळवून देण्यात मागे नाही. पोलीस विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या राज्यस्तरीय ‘बेस्ट कन्व्हिक्शन अवॉर्ड’ नुकतेच प्रदान करण्यात आले. सावनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश भोयर यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना हा पुरस्कार कामठी येथील एका खूनप्रकरणाच्या तपासासाठी देण्यात आला.
सुरेश भोयर हे २0११ मध्ये कामठी येथे पोलीस निरीक्षक (ठाणेदार) पदावर कार्यरत होते. दरम्यान, २७ जानेवारी २0११ रोजी रात्री ७ ते ७.३0 वाजताच्या दरम्यान कामठी शहरातील रमाबाई पुतळ्याजवळ आकाश गोपालसिंह यादव (२५, रा. यादवनगर, कामठी) याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे कामठी शहरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणात तपास अधिकारी सुरेश भोयर यांनी २८ जानेवारी रोजी नऊ आरोपींना अटक केली. यात मोहन ऊर्फ मोहनबाबा जंगलू गेडाम, पवन मोहन गेडाम, राजदीप मोहन गेडाम, संदीप मोहन गेडाम, सुधीर मोहन गेडाम, भवन मोहन गेडाम, सिद्धार्थ राजू धामगाये, स्वप्नील राजू गोडबोले व अल्ताफ हुसेन ख्वाजा गुलाम अब्बास यांचा समावेश आहे. भोयर यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून ते जिल्हा सत्र न्यायालयात २१ एप्रिल २0११ रोजी न्यायप्रविष्ट केले. न्यायालयाने सर्व आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. या प्रकरणाच्या तपासकार्यायासाठी सुरेश भोयर यांना राज्यस्तरीय ‘बेस्ट कन्व्हिक्शन अवॉर्ड’ प्रदान करण्यात आला