वनाधिकार कायद्यांतर्गत ४0 गावांना निस्ताराचे हक्क द्या -माजी आ. राऊत

0
12

देवरी : व्याघ्रप्रकल्पांतर्गंत येणार्‍या देवरी तालुक्यातील एकूण ४0 गावांतील लोकांना वनाधिकार कायद्यांतर्गत निस्ताराचे हक्क द्या, अशी मागणी माजी आ. रामरतन राऊत यांनी केली.
देवरी येथील पंचायत समितीच्या विश्रामगृहात मंगळवारी (दि.१0) व्याघ्रप्रकल्पग्रस्त गावातील सरपंच व ग्रा.पं. सदस्यांची सभा झाली. सभेतून त्यांनी सदर मागणी केली आहे.
अध्यक्षस्थानी आ. रामरतन राऊत होते. याप्रसंगी प्रामुख्याने जि.प. सदस्य उषा शहारे, माधुरी कुंभरे, दीपक पवार, माजी सभापती वसंत पुराम, माजी उपसभापती इंदल अरकरा यांच्यासह व्याघ्रप्रकल्पांतर्गत येणार्‍या तालुक्यातील ४0 गावातील सरपंच व ग्रा.पं. सदस्य आवर्जून उपस्थित होते.
या सभेत लोकांना संबोधित करताना माजी आ. रामरतन राऊत म्हणाले, सन २00६ च्या वनाधिकार कायद्याप्रमाणे वैयक्तिक व सामूहिक निस्तार हक्क मागच्या केंद्र सरकारने दिल्या होत्या.परंतु आता सरकार बदल्यानंतर निस्ताराचे पट्टे मिळण्याची पूर्ण प्रक्रिया बंद पडली आहे. हे अधिकार गोठविण्याकरिता सन २0१४ मध्ये राज्यातील सरकार बदलताच हे अधिकार परत करण्याचा परिपत्रक शासनाने काढला आहे. या परिपत्रकात स्पष्ट केले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सल्ल्यानुसार सदर निस्ताराचे अधिकार गोठवून त्याऐवजी वनवासी कल्याण आश्रमाच्या लोकांच्या माध्यमातून ही प्रक्रिया राबविण्याचा सरकाराचा उद्देश आहे.
जेव्हा हे अधिकार गावपातळीवर देण्यात आले होते, त्याला संविधानातील कायद्याप्रमाणे गोठविण्याचा हक्क राज्यातील मुख्यमंत्र्यांना नाही. परंतु असे अनधिकृत परिपत्रक डिसेंबर २0१४ मध्ये काढून पहिल्यांदाच अशाप्रकारचा निर्णय घेणे, हे कुठे तरी पूर्णनियोजित होते. त्यामुळेच तालुक्यातील व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या गावांतील सरपंच व ग्रा.पं. सदस्यांना त्यांच्या अधिकाराची जाणीव करून देण्यासाठी ही सभा घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

नवेगावबांध व कालीमाटी या गावांना उठवून त्यांचे जीवन नष्ट करण्याचे प्रयत्न करण्यात आले, त्याचप्रमाणे असेच कृत्य या देवरी तालुक्यातील ४0 गावांना उठवून करणार आहेत, अशी भीतीसुद्धा व्यक्त केली. यासाठी समग्र आंदोलनाची भूमिका या ४0 गावांतील सरपंचांनी घेवून माजी आ. रामरतन राऊत यांच्या नेतृत्वात कायद्याच्या अनुषंगाने न्यायालयात दाद मागणार आहेत.
याकरिता मागील १४मे रोजी नाशिक येथे राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत गोंदिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व माजी आ. रामरतन राऊत यांनी केले. या प्रक्रियेला लोकांचा भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
प्रास्ताविक माजी सभापती वसंत पुराम यांनी मांडले. संचालन विलास भोगारे यांनी केले. आभार महेश धमगाये यांनी मानले.