कुक्कुटपालन व्यवसायातून रामप्रसाद सरकार यांची आर्थिक उन्नती

0
19

यशोगाथा

          श्री. रामप्रसाद शिवपद सरकार हे मु. गौरनगर, पो. कोरंभीटोला, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया येथील रहिवासी असून ते पदवी पर्यंत शिक्षण झालेले युवक आहेत. त्यांच्या गावामध्ये शेती हा मुख्य व्यवसाय आहे, परंतु ते एक अल्प भूधारक शेतकरी आहेत. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे त्यांना कुटूंबाच्या उदरनिर्वाहासाठी इतरत्र रोजगार शोधावे लागत होते. त्यामुळे कुटूंबाला पुरेशा वेळ देता येत नव्हता व दुर्लक्ष होत होते तसेच इतरत्र रोजगारामध्ये मजुरी व कामाच्या स्वरुपामुळे ते असमाधानी होते. त्यांच्या मनात कुठेतरी असंतोष होता व याचेच रुपांतर त्यांना स्वयंरोजगार करण्याची इच्छा निर्माण झाली.

         व्यवसाय सुरु करण्याचा विचार त्याच्या मनात आल्यावर विविध प्रश्न निर्माण झाले की, आपण कोणता व्यवसाय करायला पाहिजे, बाजारपेठ स्थिती,  कच्चा माल व महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यासाठी लागणारे भांडवल   कुठून आणायचे ? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी त्याने पंचायत समिती मधील पशुसंवर्धन विभागाला भेट दिली. पशुसंवर्धन विभागातील अधिकाऱ्याद्वारे त्याला आरसेटी संस्थेविषयी माहिती प्राप्त झाली. त्याने लगेच आरसेटी संस्थेला भेट देवून कुक्कुट पालन प्रशिक्षणासाठी अर्ज केला.

        ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) गोंदिया द्वारे प्रशिक्षण सुरु झाल्यानंतर त्याने एकही दिवस गैरहजर न राहता योग्य तऱ्हेने आपले 10 दिवसाचे प्रशिक्षण पुर्ण केले. तसेच संस्थेच्या प्रशिक्षणाच्या पुर्ण अटी जसे- योगा, श्रमदान, ‍मिली सांगणे, व्यवसायीक क्षेत्रभेट यामध्ये सक्रिय सहभाग घेतला. विशेष करुन मिली (काल शिकलेले महत्त्वाचे पाठ) सांगण्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊन त्याने आपला आत्मविश्वास व ग्राहकाशी बोलण्याचे संवाद कौशल्य विकसीत करुन घेतले. तसेच त्याला विविध बँक कर्ज योजनांची माहिती प्रशिक्षणामध्ये मिळाली.

        प्रशिक्षण पुर्ण झाल्यानंतर संस्थेकडून त्याचा कर्ज प्रस्ताव पीएमईजीपी योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव सादर करुन देण्यात आले. सदर कर्ज प्रस्तावावर त्याला खादी ग्रामोद्योग नागपूर यांचे सुध्दा योग्य मार्गदर्शन प्राप्त झाले. काही दिवसानंतर त्यांना बँक ऑफ बडोदा (देना बँक) शाखा अर्जुनी मोरगाव तर्फे 8 लाख रुपयाचे कर्ज मंजुर करण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेडचे बांधकाम, साहित्य व पक्ष्यांची खरेदी करुन व्यवसाय सुरु केला. आरसेटी गोंदिया तर्फे देण्यात आलेल्या उद्योजकीय मार्गदर्शनामुळे त्याने पक्षी संगोपनासोबतच स्वत:चे चिकन दुकान सुध्दा गौरनगर या गावी लावले व आपल्यासोबत एका युवकाला सुध्दा रोजगार दिला. या दोन्ही व्यवसायातून त्याला महिन्याला अंदाजे 30 ते 35 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

         रामप्रसाद सरकार यांच्या म्हणण्याप्रमाणे कोणत्याही व्यवसायामध्ये व्यावसायीक दृष्टीकोणासोबत मानवी विचार हे सुध्दा महत्त्वाचे असते व ते व्यक्तीमध्ये विकसीत करण्यासाठी आरसेटी चे प्रशिक्षण हे उत्तम साधन आहे. रामप्रसाद हा आता आपल्या कुटूंबाच्या सर्व गरजा पुर्ण करुन आपल्या गावातील लोकांची सुध्दा सेवा करतो, त्यामुळे तो व त्याचे कुटूंबीय आनंदात आहेत.