मशरुम लागवडीतून सरिता राऊत यांची स्वयंरोजगारातून समृध्दीकडे वाटचाल

0
12

यशोगाथा

  1.    श्रीमती सरिता मनिषकुमार राऊत हया मु. शिलापूर, पो. डवकी, ता. देवरी, जि. गोंदिया येथील रहिवासी असून सदर महिला हया 12 वी उत्तीर्ण आहेत. सरिता ही ग्रामीण भागातील असल्यामुळे तिने तिच्या पतीसह शेतमजुर म्हणून काम केले, कारण त्यांच्याकडे मर्यादित शेतजमीन आहे. त्यांना शेतीच्या कामातून मर्यादित उत्पन्न मिळत होते, त्यामुळे तिला कुटूंबाच्या मुलभूत गरजा पुर्ण करण्यात अडचणी येत होत्या. आपल्या शाश्वत उदरनिर्वाहासाठी कुठला उपक्रम कसा सुरु होतो आणि कसा यशस्वीपणे चालतो याबद्दल ती गोंधळून जात होती. एके दिवशी ती ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) गोंदियाने आयोजित केलेल्या शिलापूर गावात उद्योजकता जागरुकता कार्यक्रम (EAP) मध्ये गेली, तिथे तिला विविध स्वयंरोजगार व्यवसाय प्रशिक्षणाविषयी माहिती मिळाली. दिलेल्या माहितीच्या आधारे त्या गावातील स्वयंसहाय्यता समुह (SHG) महिला गटांनी मशरुम लागवडीच्या प्रशिक्षणाकरीता स्वत:ची नोंदणी केली.

        श्रीमती सरिता राऊत यांनी ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) गोंदिया यांच्याद्वारे आयोजित दहा दिवसाच्या कालावधीत मशरुम लागवडीचे प्रशिक्षण मनापासून पुर्ण केले. तिने सर्व प्रशिक्षण क्रियाकलामध्ये सक्रिय सहभाग घेतला जसे की, मिलीचे सादरीकरण, बाजार सर्वेक्षण, कौशल्य प्रशिक्षण, मशरुम लागवडीचे व्यावहारिक सत्र. प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर तिने बचत गटात स्वत:च्या बचतीतून उपक्रम सुरु केला. सरिता आता दर महिन्याला अंदाजे 150 किलो ऑयस्टर मशरुमचे उत्पादन घेत आहे. तिचे पती जवळच्या गावातील आठवडी बाजारात मशरुम विकतात. मशरुम लागवडीच्या क्रियाकलापासून तिचे संपुर्ण कुटूंब दरमहा अंदाजे 25 हजार रुपये मासिक उत्पन्न मिळवित आहेत. सदर व्यवसायातून ती तिच्या कुटूंबाच्या इच्छा पुर्ण करीत असल्यामुळ ती आता खुप आनंदी आहे. त्यामुळे इतर महिलांनी सुध्दा नोकरीच्या मागे न लागता आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करुन आपली आर्थिक उन्नती साधावी असे त्यांनी यावेळी सांगितले. स्वयंरोजगारासाठी सरिताची मानसिकता घडविल्याबद्दल तिने ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (RSETI) गोंदियाचे खुप खुप आभार मानले.