तिबेटी निर्वासीतांचा वृक्ष लागवडीत पुढाकार; जिल्हयात ९ लाख ६३ हजार वृक्ष लागवड

0
22

गोंदिया दि.२ :- तलावांचा व नैसर्गिकदृष्टया संपन्न जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख. जिल्हयाचा ४७ टक्क्यांपेक्ष जास्त भूभाग हा वनाने व्यापला आहे. पूर्वजांनी भविष्याचा वेध घेऊन जिल्हयात सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून इथल्या माल गुजारांनी तलाव बांधले. पूढे हे तलाव माजी मालगुजारी तलाव अर्थात मामा तलाव म्हणून ओळखल्या जाऊ लागले.
जल व वनसंपन्न असलेल्या गोंदिया जिल्हयात राज्य शासनाने १ जुलै रोजी २ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला. या महत्वाकांक्षी कार्यक्रमाला जिल्हयात लोकचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले. जिल्हयाला मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व्हावी यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध यंत्रणा, सेवाभावी संस्था व विविध संघटना यांच्या बैठकाही घेतल्या. आबालवृध्दांनी या लोकचळवळीत उत्साहाने भाग घेतला. एखादा सण उत्सव असावा असाच उत्साह दिसत होता. सर्वांची लगबग सकाळपासूनच वृक्ष लागवडीसाठी दिसत होती. प्रत्येकजन एकमेकांना वृक्ष लागवड कुठे केली, कोणते झाड लावले याबाबत विचारणा करतांना दिसत होता.
IMG-20160701-WA0234 जिल्हयातील अनेक शाळांमधून बालमित्रांचा उत्साह तर वाखाणण्याजोगा होता. घरुन निघतांनासुध्दा मुले आईवडीलांना आज आम्ही वृक्षारोपण करणार हे सागतांना दिसत होते. जिल्हयाला ९ लाख ४७ हजार २९३ वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले असता जिल्हयात ९ लाख ६३ हजार ६०० वृक्षांची लागवड करण्यात आली. तब्बल १६ हजार ३०७ वृक्षांची जास्त लागवड करुन पर्यावरणाच्या संतूलनासाठीची लोकचळवळ यातून उभे राहील्याचे चित्र दिसून आले.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या इटियाडोह सिंचन प्रकल्पाच्या पायथ्याशी व याच प्रकल्पाच्या कालव्याच्या बाजूला वसलेली तिबेटियन शरणार्थी वसाहत. चिनने १९७१ ला तिबेटवर आक्रमण केल्यानंतर तिबेटियन लोकांना भारताने आश्रय दिला. भारत सरकारने त्यांचे योग्य पुनर्वसन करुन त्यांना उपजिविकेसाठी शेतीही दिली. बौध्द बांधवांचे आध्यात्मिक गुरु दलाई लामा यांच्या काही काळाच्या वास्तव्याने पुनीत झालेला गोठणगाव जवळील तिबेटियन शरणार्थी वसाहतीचा परिसर.
या वसाहतीतील नागरिकांना परिविक्षाधीन उपवनसंरक्षक राहूल पाटील यांनी सांगितले की राज्य सरकारने १ जुलै रोजी राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. सोबतच त्यांना वृक्ष लागवड मोहिमेबाबतची माहिती दिली. तेव्हा त्या नागरिकांनीसुध्दा आम्हाला या मोहिमेत सहभागी होण्यास निश्चित आवडेल असे सांगितले. या जिल्हयात आम्ही राहत असल्यामुळे आमचाही काही हातभार इथल्या विकास कामांना लागला पाहिजे त्यासाठी आम्ही वृक्ष लागवड करण्यास तयार असल्याचे सांगितले. तिबेटियन शरणार्थी वसाहतीपासून जवळपास १५ किलोमीटर असलेल्या बोंडगावदेवी येथे वनविभागाच्या जागेवर वृक्ष लागवड करण्यासाठी या वसाहतीतील ३५ नागरिक सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. वृक्ष लागवड करतांना त्यांच्यामध्ये उत्साह दिसून आला.. या चळवळीचे महत्व तिबेटियन वसाहतीतील नागरिकांनाही कळले. त्यांनी या मोहिमेला मोठा प्रतिसाद देत सहभाग घेतला. वृध्दांनीसुध्दा वृक्ष लागवड करुन पर्यावरण संतुलनाचा संदेश दिला.
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार नानाभाऊ पटोले यांनी मोरगांव/अर्जुनी तालुक्यातील बोंडगावदेवी येथे विद्यार्थी, ग्रामस्थ व तिबेटियन नागरिकांच्या सोबत वनजमीनीवर वृक्षारोपण केले.जिल्हयाचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी सकाळी आमदार आदर्श गाव कनेरी/राम या गावाला भेट देऊन वृक्षारोपण केले. त्यानंतर त्यांनी डव्वा येथील वन विभागाच्या जमिनीवर, सम्यक संकल्प धम्मकुटी, भिमघाट येथेही वृक्षारोपण केले. जिल्हयाचे पालक सचिव तथा राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. पी.एस.मीना, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही त्यांच्यासोबत उपस्थित राहून वृक्षारोपण केले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी वृक्षारोपण केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या विविध विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुध्दा वृक्षारोपण केले. तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी कामठा येथील पशूवैद्यकीय दवाखान्यात वृक्षारोपण केले. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आजच्या २ कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेत जिल्हयातील सर्वानीच पुढाकार घेतल्याने या मोहिमेला लोकचळवळीचे स्वरुप दिसून आले.