नागपूर विभागात पाच कोटी रेशीम कोशाचे उत्पादन

0
18

गोंदिया दि.9: नागपूर विभागामध्ये भंडारा, गडचिरोली, चंद्र्रपूर व गोंदिया जिल्ह्यात टसर उत्पादनाची सुमारे ३०० वर्षांची परंपरा आहे. देशात टसर उत्पादनामध्ये राज्याचा १० वा क्रमांक लागतो. विभागात महिलांनी पाच कोटी रेशीम कोश उत्पादन घेतले आहे. या टसर कोश उत्पादनासोबतच धागा तयार करणे आणि कापडापर्यंतची प्रक्रिया निर्माण झाल्यास शेतीनंतर सर्वाधिक रोजगाराच्या संधी या क्षेत्रात उपलब्ध होणार आहेत.
नागपूर विभागात असलेल्या वनसंपदेच्या आधारावर १० कोटीपर्यंत रेशीम कोश उत्पादन घेणे शक्य होणार आहे. त्यासाठी भंडारा, आंधळगाव, किटाळी, खडसंगी आदी भागात सामूहिक टसर कोश प्रक्रिया केंद्र सुरू करण्याला चालना मिळणे आवश्यक आहे. केंद्रीय रेशीम बोर्ड तसेच राज्य हातमाग संचालनालयातर्फे प्रयत्न सुरू आहेत.
राज्यात विशेषत: नागपूर विभागात सरासरी ३०० मेट्रिक टन टसर-रेशीम उत्पादन होत असून, संपूर्ण देशात २९ हजार मेट्रिक टन उत्पादन होत असल्यामुळे नागपूर व अमरावती विभागात शेतीसोबतच रेशीम व टसर उत्पादनाला भरपूर संधी उपलब्ध आहेत. या उत्पादन प्रक्रियेसाठी मुद्रा बँकेचाही सहभाग लाभल्यामुळे विविध भागात मोठ्या प्रमाणात प्रक्रिया केंद्र सुरू होण्यात मदतच होत आहे. रेशीम धाग्याला जगात सर्वाधिक मागणी आहे. या क्षेत्रात २८ हजार ५०० कोटीची निर्यात होत असून, कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा हा व्यवसाय आहे. पारंपरिक पद्धतीने मटका व पायावर १४ दिवसात केवळ एक किलो रेशीम धागा तयार करता येत असल्यामुळे दैनंदिन मजुरीसुद्धा अत्यल्प मिळत होती. बुनियादी या नवीन मशीनमुळे आता दर दिवशी २०० ग्रॅमपेक्षा जास्त धागा तयार करणे सुलभ होत असल्यामुळे २५० रुपयापेक्षा जास्त मजुरी मिळणार आहे. केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्या पुढाकाराने महिला विणकरांना हे यंत्र अत्यंत सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. देशात १० ठिकाणी एकाचवेळी बुनियाद रिलिंग मशीन प्रायोगिक तत्त्वावर वितरित करण्यात आली आहेत. या उपक्रमामुळे या प्रत्येक गावात विणकरांचे एक क्लस्टर तयार होणार आहे. टसर कोश अथवा रेशीम कोश विक्रीसाठी बाहेर न पाठवता त्यावर प्रक्रिया करून कोसा सिल्क साड्यांसह विविध उत्पादन घेण्याला प्रोत्साहन मिळणार आहे.रेशीम व टसर उत्पादनाला विकसित तंत्रज्ञानाची जोड देऊन रोजगाराची विशेषत: महिलांसाठी प्रचंड क्षमता असलेल्या या उद्योगाला निश्चितच ‘अच्छे दिन’ येणार आहे. यातून मोठ्या प्रमाणावर रोजगारसुद्धा निर्माण होतील.