जलसंधारणावर १५ कोटी खर्च; कृषी विभाग कामात आघाडीवर

0
6

गडचिरोली,दि.15: जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात जलसंधारणाच्या विविध कामांसाठी १६९ गावे आराखड्यात निवडण्यात आली. या गावांमध्ये आतापर्यंत १ हजार ६ कामे पूर्ण करण्यात आली असून ७६९ कामे प्रगतीपथावर आहेत. जलयुक्त शिवारच्या कामांवर सन २०१६-१७ या वर्षात एकूण १५ कोटी ४० लाख ६४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला आहे.सन २०१६-१७ या वर्षात कृषी विभागामार्फत पाच व जि.प. सिंचाई विभागामार्फत २५ अशी एकूण ३० कामे करण्यात आली. या कामांवर एकूण १०२.१८ लाख रूपयाचा खर्च झाला असल्याची माहिती कृषी विभागाच्या प्रशासकीय सूत्रांकडून मिळाली आहे.

राज्य सरकारने टंचाईमुक्त महाराष्ट्र घडविण्यासाठी तसेच सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान ही नवी योजना कार्यान्वित केली. सन २०१५-१६ वर्षांपासून या योजनेची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत या योजनेच्या कामांवर नियंत्रण ठेवले जात आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मातीनाला बांध, दगडी बांध, गॅबीयन स्ट्रक्चर, मजगी, शेततळे, साखळी सिमेंट बंधारा, सिमेंट नाला बांध, नाला खोलीकरण, सिंचन विहीर बांधकाम, भातखाचरे, बोडी दुरूस्ती, खोदतळे, मामा तलाव दुरूस्ती, वन व गाव तलाव दुरूस्ती, कोल्हापुरी बंधारा दुरूस्ती, भूमिगत बंधारे आदी जलसंधारणाची कामे घेण्यात आली. या कामातून गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात सिंचन क्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत कृषी विभाग, जिल्हा परिषद नरेगा व जिल्हा परिषद सिंचाई विभाग तसेच लघु सिंचन (जलसंधारण) आणि पाटबंधारे विभागामार्फत जलसंधारणाची विविध कामे सन २०१६-१७ या वर्षात घेण्यात आली. सदर कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला व सदर निधी यंत्रणानिहाय वितरित करण्यात आला. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत गावे निवडली जातात. त्यानंतर गाव आराखडा तयार केला जातो. या आराखड्याला ग्रामसभेची मंजुरी घेतली जाते. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडून जिल्हा आराखड्याला अंतिम मंजुरी प्रदान केली जाते.