सुप्रिया सुळे, फौजिया खान ताब्‍यात;राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या जेलभरो आंदोलनाला प्रतिसाद

0
14

मुंबई दि.१४- येथील आझाद मैदानावर राष्‍ट्रवादी कॉंग्रेसच्‍या वतीने सरकारच्‍या विरोधात आंदोलन केले गेले. दरम्‍यान, पक्षाचे शहराध्‍यक्ष सचिन अहीर यांच्‍यासह किरण पावसकर राहुल नार्वेकर यांच्‍यासह इतरांना पोलिसांनी अटक केली.मराठवाड्यातील गंभीर दुष्काळी परिस्थितीकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी, शेतकरी आर्थिक‍ अडचणीत सापडले आहेत. त्‍यामुळे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी आणि राज्‍यात दुष्‍काळ जाहीर करावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्‍या वतीने आज (सोमवार) मराठवाड्यातील आठही जिल्‍ह्यात जेलभरो आंदोलन केले.मराठवाड्यातील सर्व जिल्‍हा ठिकाणी हे आंदोलन झाले. दरम्यान, पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आंदोलनात सहभाग घेतला नाही. या दोन्‍ही नेत्‍यांनी मुंबईतून आंदोलनावर लक्ष ठेवल्‍याचे पक्षाच्‍या सूत्रांनी सांगितले.

जालना- जिल्ह्यातील तालुका अंबड येथे जालना-वडीगोद्री महामार्गावर सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली ‪#‎जेलभरो‬ आंदोलनासाठी महिला, युवती, शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत.
आ. राजेश टोपे, राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष फौजिया खान, मराठवाडा युवती संघटक रूचा शिंदे, कोकण विभागीय युवती संघटक आदिती तटकरे आंदोलनात उपस्थित आहेत.

परभणी- जिल्ह्यातील विसावा फाटा येथे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि सरचिटणीस उमेश पाटील यांनी बैलगाडीवर स्वार होऊन ‪#‎जेलभरो‬ आंदोलनाचे नेतृत्व केले. धनंजय मुंडे यांनी स्वतः रस्त्यावर बसून दिशाहीन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. यामुळे जमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि सरकारविरोधी प्रचंड अंसतोष एकाच वेळी पाहायला मिळत होता. यावेळी प्रताप देशमुख, स्वराजसिंह परिहार आणि प्रचंड संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

बीड-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ उपनेते जयदत्त क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी चौक, बीड येथे जेलभरो आंदोलन झाले. यावेळी जिल्हाध्यक्ष भारतभूषण क्षीरसागर, सय्यद सलीम, उषा दराडे आणि सुभाष राऊत आदी कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच प्रदेश सरचिटणीस आणि आमदार अमरसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाळी रा.म. २११ येथे उमापूर फाट्याजवळ हजारो शेतकऱ्यांनी बैलगाड्यांसह आंदोलन केले. जि.प. सभापती विजयसिंह पंडित यांनाही भेंड टाकळी फाटा येथे हजारो कार्यकर्त्यांसहीत स्वतःला अटक करून घेतली. आष्टी तालुक्यातील खडकत चौकामध्ये माजी राज्यमंत्री सुरेश धस यांच्या दोन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आले. तसेच शिरूर कासार तालुक्यात मेहबुब शेख यांनी आंदोल केले.

औरंगाबाद-विधानसभेचे माजी अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली करमाड गावातील जालना-औरंगाबाद मार्गावर आंदोलन.पाच हजार माणसे, शेकडो बैलगाड्या आणि जनावरे घेऊन आंदोलन सुरू आहे. सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झालेल्या आंदोलनाला उत्तरोत्तर प्रतिसाद वाढत आहे. मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण, पांडुरंग तागंडे, पुंडलिक आंभोरे, अभिजीत देशमुख, माजी आमदार किशोर पाटील आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित आहेत.

उस्‍मानाबाद – येथे आमदार जितेंद्र आव्‍हाड यांच्‍या नेत्‍वृत्‍वात आंदोलन होणार होते. मात्र, आव्‍हाड यांच्‍यामुळे स्‍थानिक नेतृत्‍वाला संधी मिळणार नाही, असे मत काही कार्यकर्त्‍यांनी मांडले. त्‍यामुळे जिल्‍हा नेत्‍यांच्‍या उपस्थितीत हे आंदोलन झाले.
नांदेड – येथे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्‍या नेतृत्‍वात आंदोलन झाले. पोलिसांनी देशमुख यांच्‍यासह आंदोलकांना ताब्‍यात घेतले.

या आहेत मागण्‍या
– दुष्काळग्रस्त भागातील सर्व शेतकऱ्यांची कर्जे, वीज बिले माफ करावीत
– सर्व प्रकारच्या वसुल्या थांबवाव्यात
– रबीच्या पेरणीसाठी सर्व बियाणे आणि खते मोफत द्यावीत
– खरिपाच्या पेरण्या झालेल्या ठिकाणी पीक विम्याची रक्कम तात्काळ द्यावी
– प्रत्येक गावात चारा डेपो सुरू करावा, टँकरची संख्या आणि खेपा वाढवाव्यात
– मागणीप्रमाणे टँकरने पाणीपुरवठा करावा.
– राज्य सरकारने रोजगार हमी योजना सुरू करावी
– सर्व विद्यार्थांचे शैक्षणिक शुल्क माफ करावे
– दुधाला किमान २५ रुपयांचा भाव द्यावा