आसामात २०० प्रवाशांसह नौका बुडाली

0
9

वृत्तसंस्था
कामरूप,दि.२८ : –जिल्ह्यातील कोलोही नदीत २०० प्रवाशांना घेऊन जाणारी एक यांत्रिक नौका बुडाल्याचे वृत्त असून या दुर्घटनेत किती जण मृत्युमुखी पडले वा किती जणांना वाचवण्यात आले, याबाबत कोणतीही माहिती समजली नसल्याचे सांगण्यात आले. तथापि, १०० जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना कामाख्या ग्रामीणचे उपायुक्त विनोदकुमार शेषन यांनी सांगितले की, चाईगाव येथून चम्पुपाडा येथे नौका दौड स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जाणार्‍यांना या नौकेतून नेण्यात येत होते. नदीच्या मध्यात नौकेचे इंजीन बंद पडले आणि नंतर ती पुलाच्या खांब्यावर जाऊन आदळली व बुडाली. नौकेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते आणि त्यातच नदीला पूरही आला होता.
घटना घडल्याचे समजल्यावर स्थानिक नागरिकांनी बचाव कार्य सुरू केले. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे पथकही घटनास्थळी दाखल झाले आणि त्याने मदत कार्य सुरू केले. अनेक जण पोहून पैलतिरी पोहोचले असण्याची शक्यताही शेषन यांनी व्यक्त केली. मात्र त्याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नसल्याचे सांगत नौकेतून नेमके किती जण जात होते, याबाबतही खरी माहिती नसल्याचे ते पुढे म्हणाले. मात्र स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार नौकेत खूप गर्दी होती. स्थानिक पोलिस व प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून परिसरातील इस्पितळांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात आले असल्याचेही शेषन यांनी सांगितले.