‘इसिस’चे मुख्य केंद्र महाराष्ट्र ?

0
8

वृत्तसंस्था

मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी कारवाया करण्याच्या इसिसने आखलेल्या कटाचा पर्दाफाश करत एनआयएने शुक्रवारी सुरू केलेले अटकसत्र शनिवारीही सुरूच राहिले. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूरच्या इम्रान मोअज्जम खान या २६ वर्षांच्या युवकाच्या अटकेने राज्यात पकडलेल्यांची संख्या ३ झाली आहे. ‘इसिस’च्या जाळ्याचे महाराष्ट्र मुख्य केंद्र असावे, असा एनआयएचा होरा आहे. शुक्रवारी ताब्यात घेतलेल्या १३ जणांना अटक करून दिल्लीला नेण्यात आले. इम्रान हा दोन वर्षांपासून मुदब्बीर शेखच्या संपर्कात होता, अशी माहितीही समोर आली आहे.

एटीएसच्या मदतीने एनआयएने शुक्रवारी मुंब्रा येथून मुदब्बीर शेखला अटक केली होती. तो ‘इसिस’च्या चमूचा अमीर अर्थात प्रमुख होता. तर वैजापूर येथे अटक झालेला इम्रान हा सेकंड-इन-कमांड होता. इम्रान कॉम्प्युटर हार्डवेअर इंजिनीअर असून, गेल्या दोन वर्षांपासून तो अंधेरीच्या खाजगी सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करत होता. तो मुंब्रा येथे राहत असे. आॅक्टोबर २०१५मध्ये त्याने वैजापूर येथे कॉम्प्युटर व लॅपटॉप दुरुस्तीचे काम सुरू केले होते.