पुण्यातील 13 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

0
8
वृत्तसंस्था
पुणे,दि.1- पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार महाविद्यालयातील सहलीसाठी गेलेले 13 विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील मुरूड जवळील एकदरा बीचवरील समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 13 विद्यार्थ्यांचे मृतदेह समुद्रात बाहेर काढण्यात यश आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मृतांत 10 मुली व 3 मुलांचा समावेश आहे.
 
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पुण्यातील कॅम्प परिसरातील आबेदा इनामदार सिनिअर कॉलेजमधील सुमारे 128 विद्यार्थी व शिक्षक आज सकाळी पुण्यातून तीन मोठ्या बस करून रायगडमधील मुरूड बीचवर फिरायला गेले होते. यात 66 मुले, 50 मुली व 12 शिक्षकांचा समावेश होता. ही मुले बीबीए व बीसीए या वर्गात शिकत असल्याचे कळते. आज सकाळी पुण्यातून निघाल्यानंतर दुपारी 12 च्या सुमारास तेथे ते पोहचले. दुपारी जेवण वगैरे झाल्यानंतर तीनच्या सुमारास हे विद्यार्थी मुरूड किना-यावरील समुद्रात पोहायला उतरले. अनेक मुले एकाच वेळी समुद्रात पोहायला गेली. अनेक मुले समुद्रात पुढे पुढे पोहत गेली. मात्र, अनेकांना पाण्याचा अंदाज न आल्याने व दमल्याने बुडू लागले. काय घडतयं हे कोणालाच कळेना. अनेक मुले बुडू लागल्याने आरडाओरड सुरु झाला व एकच गोंधळ उडाला. यात अनेक मुले समुद्रात खेचली गेली व बुडाली.
 
ही माहिती मिळताच स्थानिकांनी, कोस्टगार्ड जवानांनी व पोलिसांनी बचाव कार्य सुरु केले. मात्र, तोपर्यंत खूप उशिर झाला होता. केवळ चार मुलांना बाहेर काढण्यात त्यांना यश आले. आतापर्यंत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. यात 10 मुली व 3 मुले आहेत. दरम्यान अनेक मुले बुडाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे.
 

मृतांची नावे :

1. सुमय्या अन्सारी
2. सफिया काझी
3. युसुफ अन्सारी
4. फरीन सय्यद
5. इफ्तेकार शेख
6. साजिद चौधरी
7. समरीन शेख
8. शफी अन्सारी
9. राज तंजनी
10. रफिया अन्सारी
11. सुप्रिया पाल
12. शिफा काझी
13. स्वप्नाली संगत