हत्यारांसह नक्षल साहित्य जप्त

0
10

विशेष प्रतिनिधी
गडचिरोली,दि.05-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील रेगडी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील साखरदेव जंगल परिसरात नक्षलवादी व पोलीस यांच्यामध्ये चकमक उडाली. या चकमकी दरम्यान नक्षल्यांनी पळ काढला.त्या घटनास्थळावरून हत्यारांसह नक्षल साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली विशेष अभियान पथक तसेच कोटमी व रेगडी पोस्ट पार्टी मिळून जंगल भागात नक्षलविरोधी अभियान राबविण्यात येत होते. दरम्यान जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी पोलिसांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. पोलिसांनीही नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार करत प्रत्युत्तर दिले. मात्र नक्षल्यांनी पळ काढला. घटनास्थळाचा शोध घेतला असता १२ बोअर रायफल, पिट्ट, मेडिकल किट, लिखित साहित्य व दैनंदिन वापराचे साहित्य आढळून आले. सदर साहित्य जप्त करण्यात आले.
अभिनव देशमुख यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांतही जंगलांमध्ये नक्षलविरोधी अभियान तीव्र पद्धतीने सुरू आहे. आत्तापर्यंत चार नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून अहेरी तालुक्याच्या व्यंकटापूर येथे मागच्या आठवड्यात तीन नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. त्यानंतर एटापल्ली तालुक्यात २९ जून रोजी एक नक्षलवादी ठार झाला. छत्तीसगड राज्याच्या सीमेवर नक्षलविरोधी अभियान तीव्र झाल्याने पोलीस दलाला मोठे यश देशमुख यांच्या नेतृत्त्वात मिळत आहे.