दोन कोटींचे सापांचे विष जप्त

0
19

पुणे : सापाच्या विषाची तस्करी करून ती शहरात विक्रीसाठी घेवून आलेल्या आंतरराज्यीय टोळीचा खडक पोलिसांनी पर्दाफाश केला तसेच सात जणांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन कोटी रुपयांचे एक हजार मिली विष जप्त करण्यात आले आहे अशी माहिती परिमंडळ- १ चे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी दिली.

सुनिल चंद्रकांत हिरेमठ (वय-३0, मु.पो. येलीमुनोळी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव, राज्य कर्नाटक), पांडुरंग संभाजी पाटील (वय ६0, मेन बाजार पेठ, घर नं. १६९, ता. आजरा, जि. कोल्हापुर), कृष्णा केरबा कुंभार (वय ५0), चंद्रकांत गोविंदा लोहार (वय ३६ दोघेही रा. मु.पो. अनुर, ता. कागल, जि. कोल्हापुर), प्रकाश पांडुरंग सुतार (वय ३५, रा. मुपो. पांगिरे, ता. भुदरगड, जि. कोल्हापुर), प्रविण दयानंद पाटील आणि सम्मद फणिबंध (दोघेही चांदगड, कोल्हापूर) अशी आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील अन्य एका गुन्हेगाराचा पोलीस कसून शोध घेत आहेत. आरोपींविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ नुसार खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सापाच्या विषाची तस्करी करणारी कोल्हापूर येथील टोळी स्वारगेट येथे विष विक्रीसाठी येणार आहे माहिती खडक पोलीस ठाण्यातील हवालदार शैलेश जगताप यांना मिळाली. त्यानुसार, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त शरद उगले, खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, निरीक्षक (गुन्हे) संभाजी शिर्के, उपनिरीक्षक संजय गायकवाड आणि अनंत व्यवहारे यांच्यासह अनिकेत बाबर, इम्रान नदाफ, महेंद्र पवार, महेश बारावरकर यांच्या तपास पथकाने बनावट ग्राहक तयार करून शुक्रवार पेठेतील साठे कॉलनी येथील परमहंस बंगल्यासमोर सापळा लावला आणि मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तवेरा जीपमधून आलेल्या पाच जणांना ताब्यात घेतले. कारच्या तपासणीनंतर त्यांच्याकडे सापाचे विष आढळून आले. वनक्षेत्र अधिकारी सागर होले यांनी तपासणी करून ते विष असल्याचे स्पष्ट केले.