चकमकीत जहाल नक्षलवादी ठार

0
12

गडचिरोली,दि.२८: नक्षल्यांनी पुकारलेल्या शहीद सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी आज सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास गट्टा-फुलबोडी पोलिस मदत केंद्रांतर्गत भिमपूर जंगलात झालेल्या चकमकीत एक जहाल महिला नक्षलवादी ठार झाली.
नक्षल चळवळीचे प्रणेते चारु मुजुमदार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नक्षलवादी दरवर्षी २८ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत शहीद सप्ताह साजरा करतात. आजपासून या सप्ताहाची सुरुवात झाल्याने पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान भिमपूर जंगलात विशेष अभियान पथक व क्यूआरटी पथक संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबवीत होते. यावेळी पोलिसांची नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली. पोलिसांनी घटनास्थळावरुन एक १२ बोअर बदूक, २५ पिट्टू, ५ तंबू, दैनंदिन वापराचे साहित्य व काही लिखित साहित्य ताब्यात घेतले आहे. मृत नक्षलीची ओळख पटलेली नाही, अशी माहिती पोलिसांतर्फे देण्यात आली.