बोदलकसा व कुणकेश्वर येथील पर्यटक निवासस्थाने पर्यटकांच्या सेवेत – जयकुमार रावल

0
12

जागतिक पर्यटन दिनानिमित्त पर्यटनविषयक परिषद संपन्न

मुंबई, 27 : सर्वांसाठी पर्यटन हे धोरण राज्य सरकारने स्वीकारले असून राज्यातील समुद्र किनारे, गडकिल्ले, जंगले आदी पर्यटन स्थळांकडे देशभरातील पर्यटकांसोबतच विदेशातील पर्यटकांचाही ओघ वाढावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. याच प्रयत्नातून पुण्यात यंदा डिसेंबरमध्ये सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.यावेळी राज्यभरातून आलेल्या पर्यटन विषयातील तज्ज्ञांनी प्रात्यक्षिकांसह  आपले सादरीकरण केले. तसेच  बोदलकसा (जि. गोंदिया ) व कुणकेश्वर (जि. सिंधुदुर्ग) येथील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासस्थाने पर्यटकांच्या सेवेत रुजू झाल्याचे जाहीर करण्यात आले.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि जय हिंद महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून जय हिंद महाविद्यालयात पर्यटन विषयक परिषदेचे  आयोजन आज करण्यात  आले होते. यावेळी  पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंग, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. के. एच. गोविंदराज, सहव्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी, व्यवस्थापक  स्वाती काळे, उपव्यवस्थापक चंद्रशेखर  जयस्वाल, जय हिंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॅा. अशोक वाडिया प्रामुख्याने उपस्थित होते. केवळ व्यक्ती, स्थळांचा परिचय एवढाच पर्यटनाचा उद्देश नसतो तर जगाला एकसंध करण्याचे काम पर्यटनातून करता येते, असे सांगून श्री. रावल म्हणाले की, राज्यातील पर्यटन विकासासाठी राज्य शासनाने नानाविध योजना आखल्या आहेत. यंदाच्या जागतिक पर्यटन दिनाची ‘टुरिझम फॉर ऑल- प्रमोटिंग युनिव्हर्सल ॲक्सेसिबिलीटी’ ही संकल्पना आहे. जगभरात एक मोठा व्यवसाय म्हणून ओळख असलेल्या पर्यटन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सर्वांसाठी पर्यटन हे धोरण राज्य सरकारनेही स्वीकारले आहे.रावल पुढे म्हणाले की, मुंबईसह राज्यभरात अनेक पर्यटन स्थळे आहेत. त्यात मंदिरे, किल्ले, समुद्रकिनारे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. या पर्यटन स्थळांनादेशभरातील पर्यटकांसह विदेशातील पर्यटकांनी भेटी द्याव्यात यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. पुण्यात यंदा डिसेंबरमध्ये सनबर्न फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात येणार असल्याचे श्री. रावल यावेळी म्हणाले.