शाळेच्या आवारातील भिंत पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू

0
11

तिरोडा दि.20 : तालुक्यातील खैरलांजी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या आवारातील शोभेची भिंत कोसळली. त्या भिंतीखाली दबून पहिल्या वर्गात शिकणार्‍या मयंक कृष्णा भगत (६ वर्षे) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
बुधवारी दुपारी २वाजतादरम्यान दीर्घ विश्रांती सुरू असताना विद्यार्थ्याचे जेवण झाल्यावर काही विद्यार्थी खेळत होते. यावेळी मृतक मयंक व त्याची मोठी बहीण पल्लवी भगत (वर्ग ४था) हे शोभेच्या भिंतीला लागून बसले होते. मागुन दुसरा एक विद्यार्थी आला. त्या भिंतीवर चढला किंवा धक्का दिला असावा व त्यामुळे ती भिंत पडली असा अंदाज बांधल्या जात आहे.मयंकच्या डोक्याला गंभीर मार लागला. शिक्षकांनी तत्काळ त्याला तिरोडा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मयंकची बहीण पल्लवीला थोडा मार लागला आहे. तिची प्रकृती पूर्णत: धोक्याबाहेर आहे. सदर शोभेची भिंत पाच वर्षापूर्वी बांधली असल्याचे सांगितले जाते. ही भिंत प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस ३फुट रुंद, ३फुट उंच व चार इंच रूंद बनवली. त्यावर प्लास्टर करून एका बाजूस संत तुकडोजी महाराज तर दुसर्‍या बाजुला संत गाडगेबाबा यांचे चित्र काढले होते. शोभेसाठी ती भिंत बांधल्याचे मुख्याध्यापक एम.एस. पडोळे यांनी सांगितले. या घटनेनंतर गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे, विस्तार अधिकारी पी.पी.समरीत यांनी पाहणी करून घटनेची माहिती घेतली.तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.सी.एल.पुलकूंडवार,शिक्षणाधिकारी उल्हास नरड व खासदार नाना पटोले यांनीही घटनास्थळाची पाहणी करुन मृत विद्याऱ्थ्याच्या कुटूबिंयाचे सांत्वन केले.