२१ ऑक्टोबरला पोलीस स्मृती दिन कार्यक्रम कारंजा येथे

0
12

गोंदिया,दि.२० : आपले कर्तव्य बजावतांना शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिवस म्हणून देशभर साजरा करण्यात येतो. राज्यातील पोलीस दलातील २३१ अधिकारी आणि कर्मचारी आपले कर्तव्य बजावतांना शहीद झाले आहे. या शहीद पोलीसांना मानवंदना देण्यासाठी आज २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता पोलीस मुख्यालयाच्या कारंजा येथील कवायत मैदानावर पोलीस स्मृती दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे हे यावेळी पोलीस हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करणार आहे.
गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून आजपावेतो गोंदिया जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरिक्षक दिपक रहिले, कान्होली पो.नवेगावबांध ता.अर्जुनी/मोर, पोलीस उपनिरिक्षक वामन गाडेकर, क्रांती चौक पोलीस लाईन औरंगाबाद, पोलीस उपनिरिक्षक किरण धोपाडे, महावीरनगर नागपूर, पोलीस हवालदार योगेश्वर हेडाऊ, स्वामी वार्ड भंडारा, पोलीस शिपाई सर्वश्री शिवलाल बरैय्या, दासगाव ता.जि.गोंदिया, दामोधर वळतकर, बेळगाव ता.मोहाडी जि.भंडारा, अंबेराज बिसेन, एकोडी ता.तिरोडा, मुलचंद भोयर तुमसर जि.भंडारा, रविकुमार जौंजाळ कुंभारेनगर गोंदिया,भोजराम शंकर बाभरे बेला ता.जि.भंडारा, सागर राऊत सेलटॅक्स कॉलनी गोंदिया, मनोज गिऱ्हेपुंजे राजगोपालाचारी वार्ड भंडारा, मनोज बिंझाडे चांदनीटोला ता.जि.गोंदिया, इशांत भूरे सकरला ता.मोहाडी जि.भंडारा यांना नक्षलवादयाशी लढा देतांना वीर मरण आले. तसेच राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ४ नागपूर येथील पोलीस हवालदार शिवदास राय, पोलीस हवालदार अंबादास राऊत, पोलीस शिपाई सर्वश्री भाऊलाल शहारे, लक्ष्मण सोनारकर, वासूदेव सिरसाट, हरिचंद वानखेडे, पुरुषोत्तम कोल्हारकर, दामु आडे यांनाही नक्षलवादयाशी लढतांना वीर मरण आले. गोंदिया जिल्ह्याचे मूळ रहिवाशी असलेल्या केंद्रीय राज्य राखीव पोलीस दलातील उपनिरिक्षक हेतराम कटरे, शिपाई लिखनलाल कुरसूंगे यांनाही वीर मरण आले.
यावर्षी पोलीस स्मृती दिनानिमित्त वरील सर्व शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ गावी त्यांनी शिक्षण घेतलेल्या शाळा/महाविद्यालयामध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे श्रध्दांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या शहीद अधिकारी व कर्मचाऱ्यांचे तैलचित्र संबंधित शाळेमध्ये लावण्यात येणार असून शहिदांचे कुटुंबिय व नातेवाईक यांच्या उपस्थितीत सर्व शहीद पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भुजबळ यांनी केले आहे.