ग्रामपंचायत गावाचे लोकसेवा केंद्र व्हावे

0
15

बल्लारपूर : गाव विकासाचा केंद्र बिंदू गावातील ग्रामपंचायत आहे. गावकऱ्यांनी राजकारणाला थारा न देता विकासाचे ध्येय बाळगावे. ग्रामपंचायतीची इमारत दगडाविटांची असली तरी येथे सर्वसामान्य जनतेची सेवा होणे गरजेचे आहे. मतभेदाला थारा न देता मन जोडण्याचे काम येथून झाले पाहिजे. माझ्या विधानसभा क्षेत्रातील हे नाव आदर्श झाले पाहिजे. यामुळे महात्मा गांधीच्या स्वप्नातील ग्रामीण भारत निर्माण होणार आहे. नांदगाव (पोडे) येथील ग्रामपंचायतीने गाव विकासाचा आराखडा तयार करावा. विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही देत या ग्रामपंचायतीने गावाचे लोकसेवा केंद्र म्हणून कार्य करावे, असे विचार अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी नांदगाव (पोडे) येथे व्यक्त केले.

बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथे ग्रामपंचायत व तलाठी कार्यालयाचे लोकार्पण ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामपंचायतीच्या प्रांगणात मुख्य समारंभ पार पडला. तेव्हा उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे होते.