नक्षली हल्ल्यात दोन जवान हुतात्मा

0
11

रायपूर,दि.25- छत्तसीगड पोलिस आणि सीआरपीएफ जवानांद्वारे नक्षल्यांविरुद्ध ‘प्रहार’ अभियान सुरू करण्यात आले. सुरक्षादलाव्यतिरिक्त नक्षल विरोधी पथक आणि वायुसेनेलाही या अभियानात सहभागी करून घेण्यात आले आहे. शनिवारी तोंडामरका भागात जवान आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान हुतात्मा झाले. तर पाच जवान जखमी झाल्याचे कळते. यात पंधरा ते वीस नक्षली ठार झाल्याचा अंदाज आहे. शहिदांची नावे अद्याप कळू शकली नाही.
तोडामरका येथील जंगलात नक्षलविरोधी पथकाद्वारे दैनंदिन तपासणी सुरू असताना जवान आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. या अभियानाची धुरा खांद्यावर असलेले अधिकारी अवस्थी यांनी सांगितले की दीड हजार जवानांना घेऊन हे नक्षलविरोधी अभियान चालविले जात आहे. यात मोठय़ा प्रमाणात यशही आले आहे. तसेच नक्षल्यांचे खच्चीकरण करण्यातही या अभियानाला यश येत असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या नक्षल हल्यात दोन जवान शहीद झाले असून जखमी जवानांच्या मदतीसाठी हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली आहे. जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत १५ ते २0 नक्षल्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आल्याचीही माहिती आहे. एप्रिलमध्येही छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर नक्षल्यांनी मोठा हल्ला केला होता. दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला चढवला होता. या हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास २५ जवान शहीद झाले होते. तर इतर ६ जण जखमी झाले होते.