वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्र्यांची उद्योग समुहांशी चर्चा

0
17

जनरल इलेक्ट्रिक महाराष्ट्रात तीन हजार कोटींची गुंतवणूक करणार
मुंबई : इलेक्ट्रिक उपकरणांच्या उत्पादनात जागतिक पातळीवरील आघाडीच्या जनरल इलेक्ट्रिक या उद्योगसमुहाने महाराष्ट्रात तीन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. दावोस (स्वित्झर्लंड) येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर जनरल इलेक्ट्रिकचे उपाध्यक्ष जॉन राईस यांनी गुंतवणुकीबाबत माहिती दिली.

केंद्र सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ या मोहिमेसोबतच महाराष्ट्रातही उद्योगांबाबत झालेली गतीमान प्रक्रिया कौतुकास्पद असल्याचे श्री. राईस म्हणाले. या उद्योग समुहाचा तीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा विस्तारित प्रकल्प महाराष्ट्रात उभारण्यात येणार असून त्यात मोठ्या क्षमतेच्या प्लॅटफॉर्म टर्बाइन्सची निर्मिती करण्यात येईल.
दरम्यान, उद्योगांसाठी राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांची प्रशंसा करताना उद्योगांना परवाने देण्याची महाराष्ट्रातील प्रक्रिया चीनइतकीच जलद झाली असल्याचे प्रशंसोद्गार शिंडलर उद्योग समुहाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य जॉर्गेन टिंगरेन यांनी काढले.
उद्‌वाहन निर्मितीत जागतिक पातळीवर अग्रेसर असलेल्या शिंडलर या उद्योग समुहाने दुसऱ्या टप्प्यात तळेगाव येथे विस्तारित प्रकल्पासाठी गुंतवणूक करण्याचे जाहीर केले आहे. बुधवारी मुख्यमंत्र्यांशी या समुहाचे श्री. टिंगरेन यांनी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने उद्योगांच्या प्रोत्साहनासाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची श्री. टिंगरेन यांनी प्रशंसा केली.
या परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध उद्योग समुहांचे प्रमुख व प्रतिनिधींशी सकारात्मक चर्चा केली. त्यात नेस्ले, वायसी, शिंडलर, पेप्सिको, व्हिडिओकॉन, बजाज आदी उद्योग समुहांचा समावेश होता. ‘नेस्ले’ चे नंदू नंदकिशोर यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी दूध निर्यातीबाबतच्या संधी, अन्न-प्रक्रिया धोरण, सकस आहार आदींबाबत चर्चा केली.
टाकाऊ माल, कागद व बॅगा यापासून कागद तयार करणाऱ्या वायसी या ऑस्ट्रेलियन कंपनीचे प्रतिनिधी न्टोनी प्राट यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देताना कंपनीचे पथक पुढील महिन्यात महाराष्ट्रात येणार असून उद्योगाच्या उभारणीबाबत जागेची पाहणी करेल असे श्री. प्राट यांनी सांगितले.
‘पेप्सिको’च्या इंद्रा नुयी, व्हिडिओकॉनचे राजकुमार धूत, बजाज समुहाचे संजीव बजाज यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या चर्चेत राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी सहभागी झाले होते.
आज दिवसभरात मुख्यमंत्री जेट्रो, डब्ल्यूईएफ, इस्पात, मित्सुई, कॉग्निझंट, सॅफ्रन, नोवार्टिस, सीआयआय आदी उद्योग समुहांच्या प्रतिनिधींशी चर्चा करणार आहेत.