गृहखात्याचं कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष नाही – धनंजय मुंडे

0
21

कोल्हापूर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखातं स्वत:कडे ठेवलं आहे. हे संवेदनशील खातं जर मुख्यमंत्री स्वत:कडेच ठेवत असतील, तर त्या खात्याला तेवढा वेळ देणं आणि कायदा-सुव्यवस्था राखणं तितकंच आवश्यक आहे. तीन महिन्यांत बलात्कार, हत्यांच्या घटनांत वाढ होते आहे. गृहखात्याचं राज्यातील कायदा-सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, असा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी केला आहे. कोल्हापूर येथील अॅस्टर रुग्णालयात जाऊन कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीची मुंडे यांनी चौकशी केली. त्यानंतर ते बोलत होते.
पुरोगामी विचार महाराष्ट्रातून संपवूनच टाकायचा, या हेतूनं कुठेतरी नथुराम गोडसे पुरस्कर्ते आहेत अशा मनोवृत्तींचं काम चाललं असावं. कोल्हापूरच्या टोलबाबत सर्वांना एकत्र आणून पानसरे यांनी टोलमुक्तीसाठी लढा उभारला. या गोष्टीचाही त्यांच्यावरील हल्ल्याशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांनी करणं गरजेचं आहे. या तपासात मुंबई क्राइम ब्रँचची मदत घेण्याची गरज असेल, तर तात्काळ पोलिस अधिक्षकांनी ती घ्यावी. महाराष्ट्रात पुरोगामी विचार रुजवणाऱ्या, पसरवणाऱ्या माणसांना संपवून हा विचारच संपवण्याचा हेतूनं काम करणाऱ्या ज्या संघटना असतील, त्यांचीही चौकशी पोलिसांनी करावी. पुरोगामी विचारांना संपवू पाहणाऱ्यांना राज्य सरकारनं लवकरात लवकर रोखावं, अशी मागणीही मुंडे यांनी केली.
गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला करणारे हाती लागलेले नाहीत. घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली, पण उपयोग झाला नाही. संशयितांना ताब्यात घेऊनही बराच काळ झाला. त्यामुळे याबाबत पोलिसांनी खुलासा करणं आवश्यक आहे. हल्लेखोर पोलिसांनी तातडीनं पकडावेत. जास्त वेळ गेला, तर ते हाती लागणार नाहीत, अशी भीतीही या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुडे यांनी व्यक्त केली.