मध्यप्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल

0
11

भोपाळ- व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याप्रकरणी मध्यप्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्‍यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत राम नरेश यादव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे, गृहमंत्रालयाने देखील राज्यपाल यादव यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
राज्यपाल राम नरेंद्र यादव यांच्या विरोधात कारवाई करण्याची परवानगी मध्यप्रदेश हायकोर्टाने एसआयटीला दिली होती, अशी माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री थावरचंद गहलोत यांनी यापूर्वी उज्जैन येथे सांगितले होते.
एसआयटीने मागितली परवानगी
व्यापमं घोटाळ्यात राज्यपाल यादव यांचे नाव आल्याने त्यांच्या विरोधात कारवाई करण्याची एसआयटी कोर्टाकडे परवानगी माग‍ितली होती. हायकोर्टाने राज्यपाल यादव यांच्यावर कारवाई करण्‍यास एसआयटीला परवानगी दिली आहे.

दिग्विजय यांनी एसआयटीकडे सुपुर्द केले आणखी पुरावे…
व्यापमं घोटाळ्याप्रकरणी काही दिवसांपूर्वी एसआयटीच्या एक्सल शीटमध्ये काही नावे गायब असल्याचा खुलासा कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनी केला होता. एक्सल शीटमधून मुख्यमंत्री शिवराज चौहान यांच्या नाव गायब करून भाजप नेत्या उमा भारती यांचे नाव आल्याचा खुलासा दिग्विजय सिंह यांनी केला होता. तसेच दिग्विजय सिंह यांनी आज (मंगळवारी) एसआयटीकडे या प्रकरणी आणखी काही पुरावे सुपुर्द केले आहेत. दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, त्यांनी एसआयटीला काही टेलिफोन क्रमाकांची यादी सोपवली आहे. या यादीतील क्रमांक आरोपींचे असून त्यावर सीएम ऑफिसमधून संभाषण झाल्याचा दावा दिग्विजय सिंह यांनी केला आहे.

दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंग, कमलनाथ, ज्योतिरादित्य शिंदे, सुरेश पचौरी, प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अरुण यादव आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सत्यदेव कटारे यांनी संयुक्त पत्रपरिषद घेऊन या घोटाळ्याच्या सीबीआय चौकशीची आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.