अयोध्या वाद- मंदिर व मशीद बांधणार

0
9

अयोध्या- देशाच्या राजकारणात गाजलेल्या अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न न्यायालयाबाहेर सोडवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. वादग्रस्त ७० एकर जागेत मंदिर व मशीद बांधण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
बाबरी मशीद खटल्यातील प्रमुख याचिकादार हाशीम अन्सारी आणि त्यांचा मुलगा इक्बाल अन्सारी यांनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ज्ञान दास यांची भेट घेऊन नवीन प्रस्तावावर चर्चा केली. त्यानंतर हा प्रस्ताव सर्वोच्च न्यायालयाला सादर केला जाणार आहे.
अयोध्येतील हनुमान गडी मंदिराचे मुख्य पुजारी ग्यान दास म्हणाले की, वादग्रस्त जागा ७० एकरची आहे. त्यात मंदिर व मशीद उभारल्या जाणार असून त्यामध्ये १०० फुट उंचीची भिंत उभारली जाईल. भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतली जाणार आहे.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ३० सप्टेंबर २०१० पासून दोन्ही पक्षकारांमध्ये चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. या चर्चेला समाजातील विविध घटक आणि दोन्ही धर्मातील धर्मगुरुंनीही पाठिंबा दिला आहे. या प्रस्तावाचा अंतिम आराखडा तयार होत असून तो सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात येणार आहे. आम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांचे सहकार्य मागणार आहोत, असे ज्ञान दास यांनी सांगितले.
अन्सारी म्हणाले की, आमच्या चर्चेचा मसुदा तयार झाल्यानंतर त्याच्यावर दोन्ही धर्माच्या वरिष्ठ धर्मगुरुंच्या त्यावर स्वाक्ष-या घेण्यात येतील. कारण या धर्मगुरुंनी याबाबत प्रारंभीपासून सहकार्याची भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात याबाबतचा मसुदा जाहीर केल्यानंतर तो जनतेसाठी खुला केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ज्ञान दास म्हणाले की, हिंदूंच्या सर्वच धार्मिक नेत्यांशी आम्ही चर्चा केली आहे. विशेषत: आध्यात्मिक नेत्यांशी यशस्वी चर्चा झाली. आमच्या प्रस्तावाला सर्वानीच मान्यता दिली आहे.