मंत्री, अधिकाऱ्यांची पोलिस मानवंदना बंद

0
9

मुंबई – जिल्हा दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री यांच्यासह मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली जाणारी मानवंदना बंद झाली आहे. यापुढे जिल्हा दौऱ्यावर आलेल्या कोणत्याही महत्त्वाच्या व्यक्‍तीला मानवंदना दिली जाणार नाही, असे पत्रक कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलिस महानिरीक्षक देवेन भारती यांनी काढले आहे.

जिल्ह्याच्या दौऱ्यावरील मुख्यमंत्री, मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी राज शिष्टाचाराचा भाग म्हणून मानवंदना देण्याकरिता संबंधित पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सजग राहावे लागत असे. संबंधित महत्त्वाची व्यक्‍ती येईपर्यंत आणि मानवंदना होईपर्यंत पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणाहून हलता येत नसे. यामुळे पोलिस दलातील काही मनुष्यबळ केवळ मानवंदनेच्या कामात अडकून पडत असे. ही बाब ध्यानात घेऊन राज्याच्या गृहविभागाने यापुढे मानवंदना बंद करण्याचे पत्रक काढले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दौरा किंवा प्रवास करतेवेळी रहदारी अडवून ठेवू नये, अशा सक्‍त सूचना पोलिस विभागाला दिल्या होत्या. तसेच मुख्यमंत्र्यांमुळे किंवा मंत्रिमंडळातील कोणत्याही सदस्यांमुळे वाहतूक खोळंबून राहणार नाही, याकडे लक्ष देण्याचे त्यांनी ठरवले होते. तसेच जास्तीत जास्त पोलिस कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपयोगात आणण्याचे जाहीर केले होते. याला अनुसरून मानवंदना बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर मानवंदना स्वीकारायची नाही, असे ठरवून त्याची अंमलबजावणी सुरू केली होती.