बॉम्बस्फोटात हाफिज सईद ठार

0
5

पेशावर- ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद बॉम्बस्फोटात ठार झाल्याचे वृत्त आहे. भू-सुरुंग स्फोट घडवून आणण्यासाठी बॉम्ब पेरत असताना स्फोट घडल्याने त्याच्यासह त्याच्या दोन साथीदारांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानच्या वायव्य खो-यातील आदिवासी ग्रामीण भागात ही घटना घडली. सईद आणि त्याचे दोन साथीदार तूर-दारा परिसरात तिराह खो-यातील खायबर आदिवासी ग्रामीण भागात बॉम्बस्फोटात ठार झाल्याच्या वृत्ताला ‘एक्स्प्रेस ट्रीब्यून’ने दुजोरा दिला आहे.
सुरक्षा दलाने सईदसह एक व्यक्ती ठार झाल्याचा दावा केला आहे. ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेने याविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘तेहरिक ए तालिबान’ या दहशतवादी संघटेनसह इतर पाच दहशतवादी संघटनांचा सईद हा कमांडर होता. या संघटनेतून बाहेर पडल्यानंतर त्याने शहीदुल्लाह शहीद याच्या साथीने ‘इस्लामिक स्टेट पाकिस्तान’ या दहशतवादी संघटनेची स्थापना केली होती.