कारागृहात १०९ मोबाइल सापडले

0
6

नागपूर–मध्यवर्ती कारागृहातून मोबाइल सापडण्याचा ओघ सुरूच आहे. शुक्रवारी सकाळच्या सुमारास कारागृहातून आणखी नऊ मोबाइल, १७ बॅटरीज आणि काही सिमकार्ड सापडले. आतापर्यंत

  • कारागृहातून १०९ मोबाइल सापडले
  • आहेत. त्यामुळे कारागृहातील मोबाइलजप्तीने आपले शतक पूर्ण केले आहे. हे मोबाइल शुक्रवारी धंतोली पोलिसांच्या हवाली करण्यात आले.

    नागपूर मध्यवर्ती कारागृहातून पाच कैदी पळाल्यानंतर तुरुंग अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित करण्यात आले. अद्याप नागपूर मध्यवर्ती कारागृहात अधीक्षकाची नेमणूक करण्यात आली नसून २०१४-१५ या आर्थिक वर्षांत अधिकाऱ्यांची चांगली-वाईट कामगिरी त्यांच्या गोपनीय अहवालात कोण लिहिल, असा सवाल कारागृहातील अधिकाऱ्यांना पडला आहे.

    ३१ मार्चच्या मध्यरात्री पाच कुख्यात कैदी कारागृहाची सुरक्षा भेदून पळून गेले. यानंतर १ एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधीक्षक वैभव कांबळे यांना निलंबित केले. या प्रकरणात आतापर्यंत अधीक्षकासह चार तुरुंगाधिकारी, पाच शिपाई आणि एका होमगार्डवर कारवाई करण्यात आली. परंतु वैभव कांबळे हे १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या कालावधीत नागपूर तुरुंगाचे अधीक्षक होते. तुरुंगातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहिण्याची जबाबदारी अधीक्षकांची असते. पण, कांबळे आज निलंबित आहेत. अशा परिस्थितीत नवीन येणारे अधीक्षक गेल्यावर्षीच्या कामगिरीसाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवाल लिहू शकत नाहीत. त्यामुळे २०१४-१५ या आर्थिक वर्षांचे गोपनीय अहवाल कोण लिहिणार, असा प्रश्न कर्मचारी, अधिकाऱ्यांना पडला आहे.