देशातील सरकार शेतकऱ्यांचे नाही तर उद्योगपतींचे – राहुल गांधी

0
13

वृत्तसंस्था
नवी दिल्ली –मोदी सरकारचा भूमिअधिग्रहण कायदा शेतक-यांना देशोधडीला लावणारा असून, त्यापासून खासगी उद्योगांचे हित साधण्याचा मोठा डाव रचण्यात येत आहे. काँग्रेसच्या राजवटीत आणलेला शेतकरीभिमुख भूमिअधिग्रहण कायद्याची मोडतोड करून मूठभर उद्योगपतींच्या मर्जीतील कायदा शेतक-यांच्या माथी मारण्यावर मोदी सरकारचा भर आहे. याला येत्या काळात काँग्रेस सडेतोड उत्तर देईल, रामलीला मैदानावर झालेल्या शेतकरी मेळाव्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी असा यल्गार पुकारला. आम्ही जरी सत्तेबाहेर असलो तरी शेतक-यांसाठीच्या लढ्यामध्ये कोणतीही कमतरता येणार नाही, असे सोनिया गांधी यांनी आपल्या भाषणात म्हटले.
दिल्लीतील रामलीला मैदानावर आज (रविवार) काँग्रेसतर्फे किसान रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला राहुल गांधीसह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, माजी मंत्री ए. के. अँटनी, मल्लिकार्जुन खर्गे आदी नेते उपस्थित होते. सुमारे दोन महिन्यांच्या सुटीनंतर भारतात परतलेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
राहुल गांधी म्हणाले, ‘‘भारतात आज शेतकरी आणि शेतमजूर घाबरलेला आहे. या भीतीची दोन कारणे आहेत, ती म्हणजे सरकार आपल्याला विसरली आहे असे शेतकऱ्यांना वाटत आहे, हे सरकार आपले नाही. तर, दुसरी भीती म्हणजे भूसंपादन विधेयकाची त्यांना वाटत आहे. आज शेतकऱ्याला आपल्या जमिनीबाबत माहिती नाही. त्याला भीती वाटत आहे, की कधी आपली जमीन आपल्याकडून हिसकावून घेतली जाईल. आमचे सरकार असताना बुंदेलखंड, विदर्भात शेतकरी आत्महत्या करत असताना, काँग्रेस सरकारने आर्थिक पॅकेज दिले होते. आता शेतकऱ्यांची अवस्था दयनीय आहे. देशातील कमजोर आणि गरिब नागरिकांसाठी आमच्या सरकारने काम केले. काँग्रेसने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी दिली. कामगारांसाठी मनेरगाच्या माध्यमातून काम केले. शेतकऱ्यांसाठी जेवढी मदत करता आली, तेवढी मदत आम्ही केली. पण, आता तसे होताना दिसत नाही. सरकार गरिबांसाठी चालले पाहिजे, सरकारने शेतकऱ्यांसाठी काम करायले पाहिजे. परदेशात मोदींनी जे काही वक्तवे केली आहेत, ती पंतप्रधानपदाला आणि मोदींना शोभत नाही.

मोदींनी शेतकऱ्यांना फक्त स्वप्न दाखवली – डॉ. मनमोहनसिंग
काँग्रेसच्या भू-संपादन अधिग्रहण विधेयकविरोधी सभेला संबोधित करताना माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग म्हणाले, मोदी सरकारने शेतकऱ्यांना फक्त स्वप्न दाखवली आहे. डॉ. सिंग यांनी आरोप केला, की मोदी सरकार जे भू-संपादन विधेयक घेऊन आले आहे ते 2013 मध्ये यूपीए सरकारने आणलेल्या अध्येदेशाला कमकुवत करणारे आहे. ते म्हणाले, ‘शेतकऱ्याचे अनेक अधिकार काढून घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची जमीन घेतली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. आमच्या अध्यादेशात शेतकऱ्याचे हीत पाहिले गेले होते.’ सोनिया गांधी आणि राहुल गांधी शेतकऱ्यांचे लढाईचे नेतृत्व करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.