कॉ. पानसरेंच्या हत्येच्या तपासासाठी SITची स्थापना

0
14

कोल्हापूर, — कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची ( विशेष तपास पथक) स्थापना करण्यात आली असून अप्पर महासंचालक संजय कुमार एसआयटीचे प्रमुख असतील. पानसरे यांच्या हत्येला दोन महिने उलटूनही पोलिस यंत्रणेला आरोपींचा तपास करण्यास अपयश आल्याने राज्यभरात संतापाचे वातावरण होते. त्यांच्या हत्येच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात यावी अशी याचिका पानसरे कुटुंबियांतर्फे दाखल करण्यात आली होती. अखेर आज सरकारने तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
पानसरे व त्यांच्या पत्नी उमा पानसरे हे दोघे १६ फेब्रुवारी रोजी फिरायला गेले असता अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गोळीबार केला होता. गंभीर दुखापत झालेल्या गोविंद पानसरे यांचा उपचारादरम्यान २० फेब्रुवारीमृत्यू झाला. या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली होती, ती उच्च न्यायालयात प्रलंबित असतानात पानसरे यांची कन्या स्मिता आणि सून मेघा यांनी नव्याने दुसरी याचिका करून एसआयटीची स्थापना करण्याची मागमी केली होती.