जहाल नक्षल कमांडरसह दोघांना सेवाग्राममधून अटक

0
13

वर्धा,.१३-छत्तीसगड पोलिसांना मोस्ट वाँटेड असलेला व ५ लाखांचे बक्षीस शिरावर असलेला जहाल नक्षलवादी वसूल उर्फ अनिल शौरी(३०) यास वर्धा पोलिसांनी आज सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातून अटक केली. त्याच्यासमवेत आणखी दोघांना अटक करण्यात आली असून, हे दोघे भामरागड येथील रहिवासी असल्याचे समजते.
वसूल उर्फ अनिल शौरी हा नक्षल्यांच्या दलमचा कमांडर होता. छत्तीसगड सरकारने त्याच्यावर ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. ३१ मे रोजी तो भामरागड येथील राजू व महेश नामक दोन व्यक्तींसोबत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हर्निया आजाराची तपासणीसाठी गेला होता. डॉक्टरांनी त्यास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिल्याने तो पुन्हा ९ जून रोजी रुग्णालयात आला. त्याने शंकर मिच्चा या नावाने रुग्णालयात आपली नोंदणी केली. ११ जून रोजी रुग्णालयात भरती झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी (ता.१२) त्याच्यावर हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर लगेच पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्यासमवेत आलेल्या राजू व महेश नामक युवकांनाही अटक करण्यात आली आहे. या तिघांनाही गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती आहे. वर्धा पोलिसांनी अनिल शौरी याच्याकडून दोन सीमकार्ड, एक मेमरी कार्ड व एक डायरी जप्त केली आहे. अनिल शौरी नेमके काय करीत होता, त्याचा संबंध कुठल्या गुन्हयांशी आहे, याविषयीची माहिती चौकशीअंती पुढे येईल, असे सांगण्यात येत आहे.