दाऊदच्या अटी मान्य नसल्यानेच प्रस्ताव फेटाळला होता- शरद पवार

0
9

वृत्तसंस्था
मुंबई, दि. ४-अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा त्याचा साथीदार छोटा शकीलसह शरण येण्यास तयार होता. तसा प्रस्ताव ज्‍येष्‍ठ विधिज्ञ राम जेठमलानी हे भारत सरकार व माझ्याकडे घेऊन आले होते. मात्र, दाऊदने अनेक जाचक अटी घातल्या होत्या. त्‍यामुळे आपण हा प्रस्‍ताव फेटाळला होता, असा खुलासा तत्‍कालीन मुख्‍यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केला आहे.
माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा विश्वासु सहकारी छोटा शकील 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर भारताला शरण येण्यास तयार होते, असा दावा केला. मात्र, महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नकार दिल्यामुळे ही योजना फिसकटल्याचा खळबळजनक गौफ्यस्फोटही त्यांनी केला. याबाबत पवारांनी प्रथमच भाष्य करीत जेठमलानी यांच्याद्वारे दाऊदचा प्रस्ताव भारत सरकार व महाराष्ट्र सरकारकडे आला होता हे मान्य केले. मात्र, दाऊदच्या शरणागतीचा प्रस्ताव स्वीकारण्यालायक नव्हता असे स्पष्टीकरण दिले.
पवार म्‍हणाले, ‘जेठमलानी यांनी जो दावा केला तो खरा आहे. त्‍यांनी आपल्‍याकडे दाऊद आणि शकील बाबत प्रस्‍ताव ठेवला होता; पण त्‍यात कधीही पूर्तता न होण्‍या-या अटी होत्‍या. त्‍या दोघांना अटक करू नये, ही प्रमुख अट होती. पोलिसांनी थर्ड डिग्री वापरू नये, अटक करू नये, मला घरातच नजरकैदेत राहण्यास परवानगी मिळावी, असा शरणागती प्रस्ताव होता. असा प्रस्ताव स्वीकारणे अशक्य होते. मुंबई बॉम्बस्फोटात आपला सहभाग नाही असे दाऊदचे म्हणणे होते. वास्‍तविक ही दोघे अनेक देशद्रोही कारवायांमध्‍ये सहभागी आहेत. कायद्यापुढे सर्वच जण सारखेच आहेत. त्यामुळे दाऊदने भारतीय कायद्याला सामोरे जावे असे माझ्यासह केंद्र सरकारचे म्हणणे होते. त्‍यामुळे त्‍यांना अटक न करता आरामात घरामध्‍ये कसे राहू दिले जाईल’, असा प्रश्‍नही पवार यांनी उपस्थित केला.