वैद्यकीय महाविद्यालयांना केंद्रीय योजनांमधून निधी मिळवून देणार – नितीन गडकरी

0
13

शहरातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा पुरविण्यासाठी लागणारी आवश्यक औषधी व नवनवीन यंत्रसामग्रीसाठी केंद्राच्या विविध योजनांमधून निधी मिळविण्यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवा, असे निर्देश केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी अधिष्ठात्यांना दिले. नागपूरच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक वैद्यकीय सेवांना प्राधान्य देऊ. त्यामुळे केंद्राकडे त्याचे प्रस्ताव पाठविल्यास विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

नागपूर दि. ४: शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर व संलग्नित रुग्णालय याकरीता स्थापन करण्यात आलेल्या अभ्यागत मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण व शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, वैद्यकीय शिक्षण सचिव मेधा गाडगीळ, वैद्यकीय संचालक डॉ.प्रवीण शिनगारे, आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, डॉ.मिलींद माने, विकास कुंभारे, सुधाकर कोहळे, प्रा. अनिल सोले, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, डॉ. प्रकाश वाकोडे, डॉ.पावडे आदी उपस्थित होते.

नितीन गडकरी यांनी नागपूर शहरातील चारही वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातांकडून गरीब रुग्णांना देण्यात येणाऱ्या दैनंदिन आरोग्याच्या सुविधात येणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. ते म्हणाले, रुग्णालयात असलेल्या मनुष्यबळाचा व साधनसामग्रीचा पुरेपुर उपयोग करुन गरीब रुग्णांना तत्परतेने आरोग्याच्या सुविधा देण्यात याव्यात. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रसामग्रीचा योग्य वापर होत नसल्यामुळे यंत्रसामुग्री क्षुल्लक कारणामुळे खराब होतात. वैद्यकीय यंत्रसामुग्री खराब होणार नाही, यासाठी एखाद्या खाजगी कंपनीशी 5 टक्के दराने त्याची देखभाल दुरुस्ती बाबत त्वरित करार करावे व गरीब लोकांना चांगल्या प्रतीची आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करावा.

केंद्र व राज्य शासन वैद्यकीय महाविद्यालयांना कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री पुरविते. परंतु त्याची देखभाल योग्य होत नसल्यामुळे ती बंद होते. त्यामुळे रुग्णांना एक्सरे काढण्यासाठी खाजगी रुग्णालयात जावे लागते. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला व रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णांना औषधी लिहिताना जेनेरिक औषधे लिहून द्यावीत. त्यामुळे रुग्णांना कमी दरातील औषधे उपलब्ध होऊ शकतील, असेही नितीन गडकरी यांनी सांगितले.

विनोद तावडे म्हणाले की, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णांसाठी औषधे व यंत्रसामग्री खरेदीच्या ई टेंडरिंग प्रक्रियेला अधिक कालावधी लागतो. त्याचा परिणाम रुग्णांना वैद्यकीय सेवा देताना होतो. यासाठी सर्व अधिष्ठातांना औषधे व यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी यापुढे तीन लाखाऐवजी आता 30 लाख रुपयांची औषधे व साहित्य खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. अभिमन्यू निसवाडे व आभार प्रदर्शन डॉ. पावडे यांनी केले.