‘ब्रेन डेड’ रुग्णाने दिले हृदयरुग्णाला जीवदान

0
5

तिरुअनंतपुरम,(दि.26) – तब्बल पाच तासांच्या परिश्रमानंतर एका रिक्षाचालकाला जीवदान देण्यात डॉक्टरांना यश आले आहे. एर्नाकुलममधील लिझी रुग्णालयात हृदय रोपणाची ही शस्त्रक्रिया करण्यात आली. एका ‘ब्रेन डेड‘ झालेल्या रुग्णाचे हृदय नौदलाच्या विशेष विमानाने तिरुअनंतपुरमहून एर्नाकुलमला आणण्यात आले.

जीवदान मिळालेल्या या रिक्षाचालकाचे नाव आहे अचदन विट्टील अँटनी. ते गेल्या काही दिवसांपासून हृदय रोपणासाठी प्रतीक्षेत होते. दरम्यान, 22 जुलैला तिरुअनंतपुरम येथे श्री चित्रा वैद्यकीय केंद्रात ऍड. नीलकंठ शर्मा यांचा ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला. ते पाय घसरून बाथरूममध्ये पडल्याने रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांची पत्नी लता यांच्या संमतीने त्यांचे हृदय अँटनी यांना देण्याचा निर्णय झाल्यानंतर दोन्ही रुग्णालयांमध्ये झालेल्या चर्चेनंतर हृदय प्रत्यारोपणासाठी एर्नाकुलम येथे आणण्याचा निर्णय झाला.

मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अँटनी यांच्या प्रत्यारोपणासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन दिल्याने सुमारे 200 किलोमीटरचे हे अंतर कापण्यासाठी हवाई सेवेचा वापर करण्याचा निर्णय झाला. यासाठी नौदलाच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येणार होती, परंतु यापेक्षाही डॉर्निअर विमान वेगवान असल्याने त्याचा वापर करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांबरोबरच केरळ पोलिसांनी वाहतुकीत योग्य ते बदल करून या कामात हातभार लावला आणि अँटनी यांना जीवदान मिळाले.