…अखेर ‘त्या’ नागरी पतसंस्थेच्या संकलन कर्त्यांचा उपोषण मागे 

0
6

देवरी,दि.२५- गेल्या दहा दिवसापासून स्थानिक निबंधक कार्यालयासमोर आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी उपोषणावर बसलेल्या एका पतसंस्थेच्या अभिकर्त्यानी सहकार विभागाकडून लेखी आस्वासन मिळाल्याने आपले उपोषण गेल्या शुक्रवारी (दि.२३) रोजी मागे घेतले.

देवरी येथील एका नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या गुंतवणुकीचा परतावा संस्थेच्या संचालक मंडळाने केला नव्हता. त्या विरोधात त्या पतसंस्थेच्या निधी संकलन अभिकर्त्यांनी आवाज उठवला होता. परंतु, त्यांच्या मागणीला संचालक मंडळासह सहकार विभागाने केराची टोपली दाखविण्याचे धोरण अवलंबिले होते. ठेवीदारांना परतावा मिळत नसल्याने त्यांनी त्या संकलनकर्त्यांच्या मागे तगादा लावला होता. परिणामी, हतबल झालेल्या अभिकर्त्यांनी अखेर सहकार कार्यालयासमोर उपोषणाचे हत्यार उपसले.

असे असले तरीही गेल्या २२ तारखेपर्यंत सहकार विभागाने या अभिकर्त्यांच्या मागणीची तसूभरही दखल घेतली नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यावर कोणताही तोडगा काढण्यात सहकार विभागाला स्वारस्य नसल्याचे दिसून येत होते. त्यामुळे ह्या विषयी तालुक्यातील राजकारण तापू लागले. काही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपोषण कर्त्यांच्या उपोषण मंडपाला भेट देवून उपोषण कर्त्यांच्या समर्थनात समोर आले होते. परिणामी वाढता दबाव पहाता सहकार विभागाने अखेर लेखी स्वरूपात मागण्यापूर्ण करण्याचे आस्वासन २३ तारखेला दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले. उल्लेखनीय म्हणजे संकलनकर्ते गेल्या अठरा महिण्यापासून आपल्या ठेवीदारांच्या रक्कमा या नागरी पतसंस्थेकडुन परत मिळाव्या या करीता प्रयत्न करत होते. परंतु या पतसंस्थेचे संचालक मंडळच दिवाळखोर निघाल्याने ठेवीदारांच्या लाखो रुपयांच्या ठेवी संकटात सापडल्या होत्या .