पोलीस कोठडीत मरण पावलेल्या जितेंद्रच्या कुटुंबीयांची मदतीसाठी हाक

0
10

गोंदिया : दि. ७: चोरीच्या खोट्या आरोपात अडकवून शहर पोलीस ठाण्यांत पोलीस कोठडीत मरण पावलेल्या मृतक जितेंद्र राजेंद्र वैद्य यांच्या कुटुंबातील पत्नी व दोन अनाथ मुलांवर आजघडीला जीवन जगणे कठीण झाले असून त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. करिता शासनाने पत्नीला नोकरी व मदतनिधी पाच लाख रुपये त्वरीत देण्यात यावी, अशी आर्त हाक मृत जितेंद्र वैद्य यांच्या विधवा पत्नी व दोन अनाथ मुलांनी शासन दरबारी केली असून अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
या घटनेला पाच वर्ष लोटूनसुद्धा पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या शासकीय नोकरी व मुख्यमंत्री मदत निधीतून पाच लाख रुपयांटी मदत अद्याप मिळालेली नाही. या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण यांना जिल्हाधिकर्‍यांमार्फत अर्ज करुन सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.
पेट्रोल पंपवर कार्यरत आपल्या कमावत्या पतीचा पोलीस कोठडीत मारहाण व मृत्यूनंतर गेल्या ५ वर्षापासून त्यांची पत्नी सरीता आपल्या दोन अपत्य दिक्षा व हर्ष सोबत अत्यंत हलाखीचे जीवन जगत असून प्रसंगी त्यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाद्वारे तसेच पोलीस विभागाद्वारेही त्यावेळी आश्‍वासन देवून सुद्धा आजघडीला कोणत्याही प्रकारे मदत केली जात नाही. करीता आता आणखी याकरिता वाट बघण्याची सीमा संपली असून मुलांच्या संगोपनाकरीता शासकीय नोकरी व मुख्यमंत्री मदतनिधीतून ५ लाख रुपये येत्या १५ ऑगस्टपर्यंत मिळवून देण्यात यावे. अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी अपत्यांसह आत्मदहन करणार असल्याचा इशारा सरिता वैद्य यांनी दिला आहे. मदतीची मागणी पूर्ण करण्यात यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.