जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा-होमराज कापगते

0
11

साकोली दि. १0 : भंडारा जिल्ह्यात तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला असून सततच्या नापिकीमुळे कर्जबाजारी झाला आहे. गेल्या खरीप हंगामाच्या पडलेल्या धानाच्या भावामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकार व बँकांकडून कर्ज घेतले. खरीप हंगामात सुगीचे दिवस येतील असे स्वप्न बाळगून पेरणी केली. परंतु पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांचे स्वप्न भंगले. यामुळे शासनाने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य होमराज कापगते यांनी केली आहे.

शेतकऱ्यांनी महागडी बियाणे खरेदी करून पिकांची पेरणी केली. पण पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे पाणावले आहेत. सध्याच्या स्थितीत धान, तूर हे पीक पाण्याअभावी करपताना दिसून येत आहेत.

काही शेतकऱ्यांनी केलेली रोवणी वाळण्याच्या तयारीत असून काहींची रोवणीही झाली नाही. सानगडी परिसरात दिवसभर भारनियमन सुरु करण्यात आले व विद्युत पुरवठा रात्री १२ वाजता सुरु करण्यात येतो. ही एक समस्या शेतकऱ्यांपुढे आहे. त्यामुळे यावर्षी तरी वीज वितरण कंपनीने तालुक्यातील सर्वच गावातील भारनियमन बंद करून शेतीसाठी २४ तास विद्युत पुरवठा सुरु ठेवावा.

साकोली तालुका दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, वीज बील माफ करावे व हेक्टरी ४० हजार रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांनी केली आहे. अन्यथा काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात येईल, असाही इशारा कापगते यांनी दिला आहे.