गडचिरोली युकाँचे उपोषण सुरू

0
6

गडचिरोली : गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या पेसा कायद्याच्या अधिसूचनेत सुधारणा करावी, जिल्ह्यातील ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, यासह विविध मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारपासून येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अधिसूचना काढून गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींना नोकरभरतीत प्राधान्य दिले आहे. यामुळे गैरआदिवासी समाजातील युवक, युवती नोकरभरतीपासून वंचित राहत आहेत, असा आरोप युकाँ कार्यकर्त्यांनी केला आहे.

या उपोषणात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, माजी जिल्हाध्यक्ष सतीश विधाते, लता पेदापल्ली, महेंद्र ब्राम्हणवाडे, संजय घोटेकर, नीतेश राठोड, अमोल भडांगे, रजनिकांत मोटघरे, राजू गारोदे, जीवन कुत्तरमारे, नंदू खानदेशकर, हार्दिक सुचक, गौरव अलाम, राहूल मुनघाटे, अभिजीत धाईत, विक्की घोंगडे, सुमित बारई, आकाश बघेल, मंगेश पोरटे आदी कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

उपोषणकर्त्यांच्या मागण्या

जिल्हा निवड मंडळ स्थापन करुन वर्ग ३ व ४ ची सर्व पदे स्थानिक उमेदवारांसाठी आरक्षित ठेवावी, ओबीसींचे आरक्षण पूर्ववत १९ टक्के करावे, जिल्ह्यातील पोलीस भरतीत स्थानिक उमेदवारांना शंभर टक्के प्राधान्य द्यावे, जातनिहाय जनगणना तत्काळ करावी, शेतकऱ्यांच्या धानाला प्रतीक्विंटल ३ हजार ५०० रुपये भाव द्यावा, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, आयटीआय व तंत्रनिकेतनमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे वाढलेले शुल्क रद्द करावे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती तत्काळ द्यावी, ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण द्यावे.