सिंदेवाहीत कृषी विद्यापीठासाठी राज्यस्तरीय चमूकडून पाहणी

0
19

सिंदेवाही दि. १0: राज्य शासनाकडून विदर्भात कृषी विद्यापीठ देण्याचे जाहीर करण्यात आले असून शनिवारी शासनाने नियुक्त केलेल्या नऊ सदस्यीय समितीने सिंदेवाही येथे भेट देऊन पाहणी केली. त्यामुळे सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.

सिंदेवाही येथे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला अंतर्गत विभागीय कृषी संशोधन केंद्र आहे. याअंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. शासनाने सिंदेवाही येथे कृषी विद्यापीठ सुरू करावे, यासाठी आमदार विजय वडेट्टीवार यांनी शासनाकडे पत्रव्यवहार केला. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने विदर्भात कृषी विद्यापीठ सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सदर विद्यापीठ सिंदेवाही येथेच सुरू करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडूनही केली जात आहे.

शनिवारी राज्य शासनाने कृषी विद्यापीठ निर्मितीसाठी गठित केलेल्या नऊ सदस्यीय समितीने येथील विभागीय कृषी संशोधन केंद्र व कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन परिसराची पाहणी केली.

या समितीमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. बी. व्यंकटेश्वरलू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कृषी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. व्ही.एम. भाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे कृषी विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. बी.आर. उल्मेक, सामाजिक वनीकरण विभागाचे कोकण विभाग महासंचालक तथा मुख्य वनसंरक्षक यू.जी. अवसक, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे नियंत्रक विश्वास जाधव, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे नियंत्रक डॉ. राजीव कातारे, डॉ. एम.वाय. पालरपवार, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोलीचे कुलसचिव डॉ. एस.एस. नारखेडे, दापोली कृषी विद्यापीठाचे साहायक कुलसचिव ए.एस. पवार यांचा समावेश होता.

यावेळी समिती सदस्यांनी विद्यापीठ सुरू करण्यासंबंधी आवश्यक सर्व सोयीसुविधा, दळणवळण, उपलब्ध जमीन आदींची माहिती जाणून घेतली. त्यामुळे विद्यापीठ स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे.