शाळेतील ध्वजारोहणावरून आमगावात पेटले राजकारण

0
25

वरिष्ठांकडे तक्रार : शाळा समिती अध्यक्षाला मज्जाव

आमगाव ,दि.१९: -: समानता आणि राष्ट्रीय ऐक्याची शिकवण ज्या शाळेतून मुलांमध्ये रुजविण्यात येते, त्याच शाळेत जातीय समीकरणाला राजकीय रुप देऊन दलित समाजातील शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला ध्वजारोहण करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे तक्रारींमधून करण्यात आली.
आमगाव जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या शाळेत स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी गाव प्रमुख म्हणून सरपंच यांना ध्वजारोहणाचा पहिला मान देण्यात येते. परंतु आमगाव आता नगर पंचायत झाल्यानंतर सरपंचाचे पद संपुष्टात आले. त्यामुळे शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम नंदेश्‍वर यांच्या हस्ते व्हावे असे ठरले.
परंतु जातीय समीकरण आडवे आले आणि मुख्याध्यापक डी.व्ही.बहेकार यांनी आमगावचे तहसीलदार राजीव शक्करवार यांच्याशी संगनमत करून वेळेवर ध्वजारोहणासाठी अतिथींच्या नावात बदल करण्यात आला.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उत्तम नंदेश्‍वर यांना वेळेवर ध्वजारोहण करण्यास मज्जाव करून तहसील कार्यालयातील नायब तहसीलदारांना बोलावून ध्वजारोहण करण्यात आले. त्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला.यावेळी उपस्थितांनी मुख्याध्यापकांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत झालेल्या प्रकाराची तक्रार नोंदविली.