गैरआदिवासी युवक नक्षलवादी होतील-आ. विजय वडेट्टीवारना भीती

0
8

गडचिरोली, दि.१९:गैरआदिवासींना नोकरभरतीपासून वंचित ठेवणाऱ्या राज्यपालांच्या अधिसूचनेत सुधारणा झाली नाही तर आदिवासी युवक नक्षल चळवळीतून बाहेर येतील आणि गैरआदिवासी युवक नक्षलवादी होतील, अशी भीती ब्रम्हपुरीचे आमदार व काँग्रेसचे विधानसभेतील उपनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
राज्यपालांनी ९ जून २०१४ रोजी अधिसूचना काढून गडचिरोली जिल्हयातील आदिवासींना नोकरभरतीत प्राधान्य दिले आहे. यामुळे गैरआदिवासी समाजातील युवक,युवती नोकरभरतीपासून वंचित राहत आहेत. या अधिसूचनेत सुधारणा करावी,या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ९ ऑगस्टपासून गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात बेमुदत साखळी उपोषण आरंभिले आहे. आ. विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारला उपोषणमंडपाला भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. यावेळी. आ. वडेट्टीवार म्हणाले, भाजपने सत्तेत येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नाही. उलट भाजपचे लोकप्रतिनिधी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. येत्या २६ ऑगस्टला गडचिरोली जिल्हयाचा वर्धापन दिन असून, या दिवशी आम्ही भाजप नेत्यांनी निवडणुकीपूर्वी व निवडणुकीच्या काळात दिलेल्या भाषणाची ध्वनीफित लोकांना ऐकवू, असा इशाराही त्यांनी दिला. ५० वर्षे अधिसूचना बदलणार नाही, असे गडचिरोलीचे आमदार डॉ.देवराव होळी म्हणाले. याचा अर्थ गैरआदिवासींनी या जिल्हयात राहू नये, असा जणू इशाराच आ.डॉ.होळी यांनी दिला आहे, अशी टीकाही आ.वडेट्टीवार यांनी केली. हे सरकार मूठभर लोकांच्या हितासाठी काम करीत आहे. अलिकडे मंत्रालयात मंत्र्यांच्या आस्थापनेवरील ओबीसी अधिकाऱ्यांना काढून विशिष्ट लोकांचीच वर्णी लावण्याचा सपाटा या सरकारने चालविला आहे, असा गंभीर आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला. आठ महिन्यात राज्य सरकारने महाराष्ट्राच्या डोक्यावर ३६ हजार कोटींचे कर्ज वाढविले, असे सांगून आ.वडेट्टीवार यांनी अंगणवाडी सेविका, शेतकरी व विद्यार्थ्यांच्या हिताकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याबद्दल घणाघाती टीका केली. राज्यपालांनी काढलेल्या अधिसूचनेत बदल झाला नाही, तर आदिवासी युवक नक्षल दलममधून बाहेर येतील आणि गैरआदिवासी युवक, युवतींवर दलममध्ये भरती होण्याची पाळी येईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. अधिसूचना रद्द करण्यासंदर्भात काँग्रेसने शनिवारी २२ ऑगस्ट रोजी जिल्हा बंदचे आयोजन केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष पंकज गुड्डेवार, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अॅड.राम मेश्राम, महेंद्र ब्राम्हणवाडे, लता पेदापल्ली, नंदू वाईलकर, सुनील डोगरा, सुमंत मोहितकर, अमोल भडांगे, नीतेश राठोड, गौरव अलाम, नीलेश बाळेकरमकर, जितू ठाकरे, आशिष कन्नमवार, प्रतीक बारसिंगे, मिलिंद खोब्रागडे, मनिष डोंगरे, सर्वेश पोपट, श्री.गावतुरे, आकाश बघेल, हेमंत मोहितकर, सुमीत बारई, राकेश गणवीर उपस्थित होते.