कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करा- जिल्हाधिकारी

0
72

गोंदिया दि.12= केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येते. त्यानुसार जिल्ह्यात घरी तपासणीसाठी आलेल्या चमुला सहकार्य करुन कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.

10 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात कुष्ठरोग शोध अभियानाबाबत आढावा घेण्यात आला, त्यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

यावेळी श्री डांगे यांनी गावपातळीवर आरोग्य पाणीपुरवठा व स्वच्छता समितीमार्फत गावातील सर्व नागरिकांचा सहयोग आणि सहभाग घेण्याकरीता पंचायत विभागामार्फत सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात 1981 मध्ये दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण 61 कुष्ठरोगी असे होते, आज हे प्रमाण राज्यात 1 पेक्षा कमी झाले आहे. परंतु गोंदिया जिल्ह्यामध्ये दर दहा हजारी कुष्ठरुग्णांचे प्रमाण 1 पेक्षा जास्त (पीआर 1.48) आहे. म्हणून जिल्ह्यामध्ये कुष्ठरुग्णांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त वतीने समाजातील लपलेले कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणण्याकरीता सक्रीय कुष्ठरोग शोध व नियमीत सनियंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यात विविध समिती गठीत करुन कार्यशाळा, प्रशिक्षण, जनजागरण व प्रसिध्दीचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, स्वयंसेवक यांचे मार्फत प्रत्यक्ष घरोघरी जाऊन कुटूंबातील सर्व सदस्यांचे त्वचा रोग तपासणी करण्यात येईल. महिला सदस्यांची तपासणी आशा सेविकामार्फत व पुरुष सदस्यांची तपासणी पुरुष स्वयंसेवकांमार्फत करण्यात येईल. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीत आरोग्य सेवा कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक डॉ.आर.जे.पराडकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे कुष्ठरोग शोध अभियानाबाबत सविस्तर माहिती दिली. सभेला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन कापसे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.बी.राऊत, वैद्यकीय अधिकारी डॉ.सीमा यादव, बी.पी.भोकासे व तालुका वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.