न्यू लक्ष्मीनगर जलमय तर तीन तालुक्यात अतिवृष्टी

0
34

गोंदिया दि. २९-गेल्या महिनाभरापासून दडी मारलेल्या पावसाने अखेर २८ ऑगस्टच्या सायकांळापासून जिल्ह्यात लावलेल्या जोरदार हजेरीमुळे गोंदिया शहरातील अनेक वस्त्याजलमय झाले.सोबतच तीन तालुक्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टी झाल्याने नाल्यांना पूर येऊन रस्ते सुध्दा बंद पडले आहेत.या पावसाने गोंदिया नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाची मात्र चांगलीच पोलखोल केली.
अर्जुनी- मोर, सालेकसा, व देवरी या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून २४ तासात जिल्ह्यात २७१९.२ मि.मी. पाऊस पडला.त्याची सरासरी ८२.४ मि.मी. इतकी आहे. दरम्यान सडक अर्जुनी तालुक्यात काही घरांची अंशत: पडझड झाली असल्याची माहिती असून सालेकसा तालुक्यातील ग्रामीण मार्ग नाल्यांना पूर आल्यामुळे बंद झाले होते. सतत सुरू असलेल्या पावसाच्या लपंडावाने qचतातुर झालेला बळीराजा रात्री पडलेल्या पावसाने थोडाफार सुखावला आहे.
गोंदिया, गोरेगाव, अर्जुनी – मोर, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, आमगाव व तिरोडा या आठही तालुक्यात वादळी वाèयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.आज पहाटेपासून सकाळपर्यंत आलेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील काही मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.
गोंदिया, गोरेगाव, आमगाव, सडक अर्जुनी या तालुक्यातीलही काही मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे. ज्यामध्ये गोंदिया तालुक्यातील गंगाझरी, रतणारा, रावणवाडी, गोंदिया या चार मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. तर गोरेगाव तालुक्यातील गोरेगाव, मोहाडी, आमगाव तालुक्यातील आमगाव, तिगाव, ठाणा, तर सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड व डव्वा या मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. पावसामुळे सालेकसा तालुक्यात काही नाल्यांनाही पूर आले असून इर्रीटोला ते दुर्गुटोला, बोदलबोडी ते भजेपार, नानवा ते घोण्शी, धानोली ते पिपरटोला व लोहारा ते शेडेपार हे मार्ग काही वेळाकरिता हे बंद झाले होते. काल, पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यात कुठेही मोठी हानी झाली नसली तरी सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड परिसरातील सिताबाई यदूनाथ शहारे, तुळशीराम वासुदेव राऊत व सुभद्रा बळीराम इरले यांच्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.
जल्ह्यात एकूण ३३ मंडळ असून मागील २४ तासात ८२.४ मि.मी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यात ८५.१ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर गोरेगाव ७८.५ तिरोडा ४८.१, आमगाव ८५.४, सडक अर्जुनी ६५.७, मि.मी सरासरी पाऊस पडला असून अर्जुनी मोर, देवरी, सालेकसा या तीन तालुक्यात अतिवृष्टी झाली असून अर्जुनी – मोर तालुक्यात ९२.२ मि.मी, देवरी ११८.७ मि.मी., तर सालेकसा तालुक्यात ९४.५ मि.मी सरासरी पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यात असा एकूण ८२.४ मि.मी. तर १ जून ते आत्तापर्यंत ८०८.१ मि. मी. सरासरी पावसाची नोंद करण्यात आली आहे.