इसापूरच्या महिलांनी केली दारूच्या डबक्यांची होळी

0
9

तिरोडा,,दि.१- तालुक्यातील इसापूर येथील महिलांनी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घेतला. त्यानंतरही दारूविक्रेते व दारू पिणारे जुमानत नसल्याचे पाहून महिलांनी दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. दारूविक्रेत्यांकडून दारूच्या डबक्या जप्त केला व त्यांची होळी केली. त्यामुळे दारूविक्रेते व मद्यपींचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या काही वर्षात इसापूर येथील दारूविक्रेते व मद्यपींची संख्या वाढल्याने गावातील शांतता व सलोख्याचे वातावरण खराब होत चालले आहे. मद्यपींचा सर्वाधिक त्रास हा गावातील महिला व मुलींना होत असल्याने त्यांच्याकडून गावात दारूबंदीची मागणी केली जात होती. परंतु, संबंधित प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेरीस १५ ऑगस्टला महिलांनी एकत्र येऊन दारूबंदीचा ठराव पारीत केला. दारूबंदीचा ठराव पारीत झाला. परंतु, गावात सर्रास दारूविक्री सुरू असून मद्यपी जुमानत नसल्याचे पाहून बचत गटाच्या महिला व गावातील इतर महिला दारूविक्रेत्यांविरोधात रस्त्यावर उतरल्या. दारूविक्रेत्यांच्या घरावर, दुकानावर धाड टाकून दारूच्या डबक्या जप्त केल्या व त्यांची होळी केली. त्यामुळे दारूविक्रेते व मद्यपींचे चांगलेच धाबे दणाणले आहे. दारूबंदीसाठी दारूबंदी समितीच्या अध्यक्षा मंगला भालाधरे, उपाध्यक्षा आशा शहारे, सचिव मंदा किरपानकर, यशोदा बारबैले, संगीता दुधबर्वे, कांता सोनवाने, सरपंच संतोष बावनकर, उपसरपंच दुर्गा किरपानकर, पोलीस पाटील के. एन. कुंभलकर, तंटामुक्ती अध्यक्ष किशोर बावनकर, जितेंद्र साठवणे, ऊर्मीला डहाट, रविकांता पाटील, मामा साठवणे, कविता शहारे आदींनी पुढाकार घेतला.