नगराध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल

0
19

गडचिरोली,दि.१.:येथील नगर परिषदेच्या अध्यक्ष निर्मला मडके यांच्यावर आज त्यांच्याच गटाच्या नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.
डिसेंबर २०११ मध्ये गडचिरोली नगर परिषदेची निवडणूक झाली. या निवडणुकीत पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेचे १३ नगरसेवक निवडून आले. पहिल्या अडीच वर्षांसाठी नगराध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने भूपेश कुळमेथे यांच्या गळयात नगराध्यक्षपदाची माळ पडली. अडीच वर्षानंतर हे पद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने त्या पदासाठी रस्सीखेच सुरु झाली. त्यावेळी निर्मला मडके व डॉ.अश्विनी धात्रक ही दोन नावे पुढे आली. मात्र, नगर परिषदेतील गटनेते प्रा.राजेश कात्रटवार यांनी निर्मला मडके यांच्या बाजूने कौल दिल्याने त्या नगराध्यक्ष झाल्या. परंतु त्यांना सव्वा वर्षासाठी नगराध्यक्षपद दिले जाईल व पुढील सव्वा वर्षासाठी डॉ.अश्विनी धात्रक यांना संधी देण्यात येईल, असे त्यावेळी ठरविण्यात आले होते. अलिकडेच २८ ऑगस्ट रोजी निर्मला मडके यांच्या नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीला सव्वा वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे डॉ.अश्विनी धात्रक यांना संधी देण्यासाठी निर्मला मडके यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सत्ताधारी गटात जोर धरु लागली व तसे निर्मला मडके यांनाही सांगण्यात आले. परंतु त्यांनी राजीनामा देण्यास साफ नकार देऊन पुढील सव्वा वर्षे आपणच नगराध्यक्ष राहू, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी गटाच्या बहुतांश नगरसेवकांनी शेवटचा पर्याय म्हणून अविश्वास प्रस्तावाचे हत्यार उपसले आणि आज जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आला.