गडचिरोली,दि. ४ : केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिल्लीत बैठक घेतल्यानंतर राज्य व केंद्र सरकारने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहप्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र, खाणीसंदर्भातील आजवरचा अनुभव लक्षात घेता सुरजागड येथे खाण प्रकल्प सुरु झाल्यास गडचिरोली जिल्हयात नक्षलवाद वाढेल, अशी भीती भूमकाल संघटनेने व्यक्त केली आहे.
भूमकाल संघटनेचे सहसचिव प्रा.अरविंद सोवनी यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी अलिकडेच दिल्लीत बैठक घेतल्यानंतर राज्य व केंद्र सरकारने एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लोहप्रकल्प सुरु करण्याच्या जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत.”नक्षलग्रस्त भागाचा विकास” या गोंडस नावाखाली जरी हे सुरु असले, तरी उलट खाण प्रकल्प सुरु करण्याच्या हालचाली होताच नक्षल कारवाया वाढतात, असा देशभरातील विशेषत: ओरिसा(नियमगिरी), झारखंड(हजारीबाग, सरांडा), पश्चिम बंगाल(सिंगूर, नंदीग्राम), छत्तीसगड(लोहांडीगुडा)मधल अनुभव सांगतो. या अनुभवावरुन एक गोष्ट स्पष्ट आहे की, आधी शासनाला स्थानिक आदिवासींच्या खनिजावरील हक्काबाबत भूमिका स्पष्ट करावी लागेल. खनिजातून येणाऱ्या समृद्धीत आदिवासींचा वाटा काय? हे सांगावे लागेल, असेही प्रा.सोवनी यांनी म्हटले आहे.
सुरजागडपासून छत्तीसगडपर्यंत बरेच खनिज साठे आहेत.त्यामुळे ग्रामसभांच्या माध्यमातून कंपनी अथवा महामंडळ स्थापून आदिवासींना खनिज उत्खननाचा अधिकार देण्याचा देशातील पहिला प्रयोग महाराष्ट्रात करता येईल. सुरजागड खाण सुरु करण्यापूर्वी इतर एखाद्या खनिज साठयाबाबत अशा प्रयोगाची चाचपणी करावी. यात टाळाटाळ केली तर लोकभावना भडकतील व एटापल्ली, भामरागड भागात मोठया प्रमाणात नक्षल कारवाया वाढतील, असा इशाराही भूमकाल संघटनेचे प्रा.अरविंद सोवनी यांनी दिला आहे.