प्रलंबित मागण्यांसाठी साखळी उपोषण

0
5

उपोषणाला पालकमंत्र्यांची भेट

देवरी ,दि.१२ : ४४ प्रलंबित मागण्यांसाठी ५ सप्टेंबरपासून एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयासमोर साखळी उपोषणावर बसलेल्या आश्रमशाळेच्या शिक्षकांना महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शुक्रवारी भेट देऊन मागण्या पूर्ण करण्याचे आश्‍वासन दिल्यावरही शिक्षकांनी उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार केला आहे.
आदिवासी आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघठणाच्या नेतृत्वात करण्यात येत असलेल्या साखळी उपोषणात गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या शिक्षकांचा सहभाग आहे.या सर्व कर्मचार्‍यांचा जून महिन्यापासून पगार देण्यात आलेला नाही. जुलै २0१५ च्या वार्षिक वेतनात वाढ न करण्याच्या आदेशाविरुद्ध शिक्षकांचा रोष आहे.विशेष म्हणजे आश्रम शाळेच्या शिक्षकांनी आपल्या मागण्या व समस्यांसाठी या अगोदरही उपोषण केले. परंतु आदिवासी विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचार्‍यांना शासकीय कर्मचार्‍यांनुसार पगार, सेवाशर्ती, सेवा सुरक्षा व्यतिरिक्त ४४ अन्य महत्वपूर्ण मागण्यांकरीता साखळी उपोषणाला बसलेल्या शिक्षकांना सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी भेटून त्यांचे निवेदन स्वीकारले.
शिक्षकांच्या मागणी संदर्भात आदिवासी आयुक्त माधवी खोडे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन शिक्षकांना न्याय देण्याचे आदेश दिले. शासन स्तरावरील मागण्यांकरिता येत्या १५ सप्टेंबर रोजी मंत्री मंडळाच्या बैठकीत प्रश्न उपस्थित करुन न्याय मिळवून देण्याचे आश्‍वासन बडोले यांनी दिले.
जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत साखळी उपोषण सुरूच ठेवण्याची भूमिका शिक्षकांनी घेतली आहे.
मागण्या त्वरित पूर्ण न झाल्यास उपोषण सुरूच राहील असा इशारा यावेळी शिक्षकांनी दिला आहे. उपोषणात संघटनेचे अध्यक्ष एस.आर. शर्मा, उपाध्यक्ष भोजराज फुंडे, सचिव विलास सपाटे, कोषाध्यक्ष एस.बी. टेकाम, सहसचिव बी.डी. गुंजाम, जे.पी. खुने, आर.ए. मारवाडे, आर.एच. मेश्राम, एस.जे. लंजे, आर.बी. झिंगरे, जी.बी. गुडमार्गी, ए.बी. सार्वेसह शेकडो शिक्षक साखळी उपोषणावर बसलेले आहेत.