गोंदिया जिल्ह्यात फक्त 3 गणेश मंडळानी केला विजपुरवठाकरिता अर्ज

0
9

गोंदिया दि. १६ -जिल्ह्यात दरवर्षी सार्वजनिक मंडळांतर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. लहान-मोठी हजारोच्या संख्येने मंडळे जिल्ह्यात आहेत,पोलिसांच्या नोंदीनुसार ९९० सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. परंतु, जिल्ह्यात सडक अर्जुनी तालुक्यातील तीन अर्ज वगळता एकही अर्ज विद्युत कनेक्शनकरीता आलेला नाही. गोंदिया शहरातील मोठ-मोठ्या मंडळांपैकी एकाही मंडळाने वीज जोडणीसाठी अर्ज केलेला नाही. उर्वरीत ९८७ गणेशोत्सव मंडळांनी अद्यापही अर्ज न केल्याने या मंडळाच्या वीज वापरावर महावितरण कसे लक्ष ठेवते हे बघावे लागणार आहे.काही मंडळांना एकतर बाजुच्या घरातील वीज वापरावी लागणार किंवा थेट विजेच्या तारांवर आकडे टाकून वीजचोरी करावी लागणार आहे.तेव्हा धार्मिकतेचा मुद्दा सोडून महावितरणने जे गणेश मंडळ विज चोरी करताना दिसेल त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पुढाकार घेते की नतमस्तक होते हे सुुध्दा बघावे लागणार आहे.

गणेशोत्सव साजरा करणार्‍या सार्वजनिक मंडळाने या उत्सवासाठी वीज कनेक्शन मागणारा रितसर अर्ज महावितरणकडे करणे गरजेचे आहे. गोंदिया जिल्ह्यातील ९९० उत्सव मंडळांनी पोलिसांकडे गणेश स्थापनेची परवानगी मागितली. त्यातील बहुतांश मंडळे चोरीची वीज वापरण्याची शक्यता आहे. एकीकडे मंडप, रोषणाई, मिरवणुका, डिजे अशा भपकेबाजपणावर लाखो रुपये खर्च करण्याची तयारी दर्शविणारे मंडळ १०-१५ हजाराच्या वीजेसाठी चोरी का करतात? ही बाब आश्‍चर्याची ठरत आहे.